पुणे – झारखंडच्या रिजनल डेव्हलपमेंट सेंटर संघाने भिवनीच्या पंचपीर स्पोर्ट्स क्लबचा पराभव करून 5 व्या एसएनबीपी अखिल भारतीय 16 वर्षाखालील मुलांची हॉकी स्पर्धेत आपली विजयी घोडदौड कायम ठेवत बाद फेरीतील आपली जागा निश्चित केली.
या स्पर्धेत ड गटाच्या सामन्यात झारखंडच्या रिजनल डेव्हलपमेंट सेंटर संघाने भिवनीच्या पंचपीर स्पोर्ट्स क्लबचा 4- 1 गोलने पराभव केला. सायंकाळी झालेला सामना रिजनल डेव्हलपमेंट सेंटर संघाने मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन संघाला 4-2 गोलने पराभूत केले होते. ड गटात रिजनल डेव्हलपमेंट सेंटर संघाने दोन्ही सामने जिंकल्यामुळे त्यांनी 6 गुणांची कमाई करीत बाद फेरीतील आपल्या जागा निश्चित केली.
इ गटाच्या लढतीत नागपूर हॉकी अकादमीने हॉकी युनियन ऑफ तामिळनाडू संघाचा 10-0 गोलने धुव्वा उडविला. एफ गटाच्या झालेल्या लढतीत पटणाच्या आर. के. रॉय अकादमीने हॉकी नाशिक संघाचा 16-2 गोलने धुव्वा उडविला. जी गटात एसएनबीपी अकादमीला केरळचा पीएमएसएएमएएचएसएस संघ गैरहजर राहिल्यामुळे पुढे चाल देण्यात आली.
राज्य स्पर्धेत पुणे व कोल्हापूर अंतिम लढत
राज्य अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत विजेतेपदासाठी 2019 च्या स्पर्धेचाच ऍक्शन रिप्ले पाहायला मिळणार आहे. गतविजेते पुणे आणि उपविजेते कोल्हापूर यांच्यातच पुन्हा एकदा विजेतेपदाची लढत रंगणार आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत पुणे संघाने उस्मानाबादचा एकतर्फी खेळात 6-1 असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य लढतीत कोल्हापूरने औरंगाबादचे आव्हान 3-0 असे संपुष्टात आणले.