डी-मार्टसमोरील बेकायदा पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी
हिंजवडी – सर्वात वर्दळीचे ठिकाण असलेल्या हिंजवडीतील डी-मार्टसमोरील मुख्य रस्त्यावर अनधिकृतपणे वाहने पार्क केली जात आहेत. ओला, उबेरच्या गाड्यांसह रिक्षाचालकांमुळे हिंजवडीतील वाहतूक कोंडीत वाढ झाली आहे. त्यामुळे आयटीयन्स प्रवाशांसह स्थानिक नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. याकडे वाहतूक पोलीस जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याने अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई कोण करणार, असा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
एमआयडीसीने डी-मार्टसमोर नो-पार्किंगचे फलक लावले असताना त्या ठिकाणी सर्रासपणे दुचाकी, चारचाकी गाड्या उभ्या करून प्रवासी वाहतूक केली जाते. शनिवार, रविवारी कंपन्यांना सुटी असल्याने खरेदीसाठी लाखो ग्राहक बिग बजार, डी-मार्ट येथे येतात. अनेकजण खासगी वाहनांचा देखील वापर करतात. ही सर्व वाहने मुख्य रस्त्यावरच लावली जात असल्याने सुटीच्या दिवशीही हिंजवडीकरांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांशी आर्थिक हितसंबंध जुळल्यामुळे ड्युटीवर असणारे वाहतूक पोलीसही सोयीस्करपणे याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. वाहतूक पोलीस केवळ नो-एंट्रीमधून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना दिसत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
हिंजवडी वाकड मुख्य रस्त्यावर सध्या मेट्रोचे काम सुरू झाल्याने दोन्ही बाजूंनी बॅरीगेडस लावल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे केवळ अर्धा रस्ता वाहतुकीसाठी खुला असल्याने त्यातच रस्त्याच्या एका लेनमध्ये नो-पार्किंगच्या ठिकाणी गाड्या उभ्या राहत असल्याने याठिकाणी नेहमी वाहतूककोंडी होताना दिसते. दररोज अस्ताव्यस्त गाड्या पार्क केल्या जात असल्याने वाहतूककोंडीत अधिकची भर पडते. त्यामुळे अशा मुजोर वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे. डी-मार्टसमोर अस्ताव्यस्तपणे उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई केव्हा होणार, असा प्रश्न आयटीयन्स प्रवाशांकडून देखील उपस्थित केला जात आहे.
अशा वाहनांवर यापूर्वी अनेकदा कारवाई केली आहे. आम्ही ध्वनीक्षेपणाद्वारे देखील लोकांमध्ये जनजागृती करत आहोत. वाहतूक पोलीस बाजूला गेल्यावर लगेच अस्ताव्यस्त वाहने पार्क केली जातात. त्यामुळे आता संबंधित मॉल व डी-मार्टला नोटीस काढणार आहोत. त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था त्यांनीच केली पाहिजे, अशा पद्धतीची नोटीस बजावणार आहोत.
– विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, हिंजवडी.
हिंजवडी पोलीस ठाण्यासमोरच वाहतुकीचा फज्जा
आयटी पार्कच्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या हिंजवडी पोलीस ठाण्याच्या इमारतीसमोर नो-पार्किंगचे फलक लावले असतानाही येथे पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांच्या चारचाकी गाड्या सर्रासपणे लावल्या जातात. तर काही राजकीय नेते, पोलीस अधिकारीही स्वतःच्या कार पार्किंग करून लगत असलेल्या एका पंचतारांकीत हॉटेल्समध्ये बसलेले असतात. अनेक वाहने आयटीतील रहदारीस अडथळा निर्माण करतात.