करोनाकाळात बनविले 800 ऑक्सिजन बेडचे इस्पितळ
पिंपरी – नेहरूनगर येथे अण्णासाहेब मगर स्टेडिमय मैदानावरील 800 ऑक्सिजन बेडचे जम्बो रुग्णालय बंद करून ते हटविण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे तेथील मोकळे मैदान दिसू लागले असून पावणेदोन वर्षांनंतर खेळण्यासाठी मैदान मोकळे झाले आहे.
करोनाच्या महामारीत रुग्णांना बेड कमी पडू लागल्याने पीएमआरडीए, जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिकेच्या माध्यमातून नेहरूनगरच्या अण्णासाहेब मगर स्टेडिमय मैदानावर 800 बेडचे तात्पुरते जम्बो रुग्णालय उभारण्यात आले होते. याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 25 ऑगस्ट 2020 ला झाले होते. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जम्बो रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांवर उपचार केले गेले. तिसऱ्या लाटेसाठी जम्बो रुग्णालय तयार ठेवण्यात आले होते. मात्र, शहरातील रुग्ण संख्या नियंत्रणात असल्याने जम्बो रुग्णालयात पालिकेने एकही रुग्ण दाखल केला नाही.
रुग्णसंख्या कमी झाल्याने आणि महापालिकेचे आकुर्डी, थेरगाव, जिजामाता व भोसरी अशी चार मोठी रुग्णालये कार्यान्वित झाली आहेत. तेथे करोनाच्या रुग्णांवरही उपचार केले जात आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने जम्बो रुग्णालय 28 फेब्रुवारी 2022 नंतर कायमचे बंद करण्याचा निर्णय घेतला. तेथील वैद्यकीय यंत्रसामग्री, साहित्य व तंबू काढून घेण्याचे काम मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाले. व्हेंटिलेटर, सिटी स्कॅन, एक्स रे मशिन, डॉयलिसीस, ऑक्सिजन प्लॅण्ट आदी वैद्यकीय यंत्रसामग्री तसेच, ऑक्सिजन बेड पालिकेच्या रुग्णालयात हलविण्यात आले.
जम्बो रुग्णालये हटविण्यात आले असून मैदान मोकळे करण्यात आले आहे. मैदान लवकरच सपाटीकरण करून मैदान सराव व खेळण्यासाठी खुले केले जाणार आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मैदानात रनिंग, जॉगिंग व वॉकिंग तसेच, क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल व इतर खेळांचा सराव केला जातो. मैदान लवकरच खुले होणार असल्याने खेळाडू, नागरिक व ज्येष्ठ नागरिकांची सोय होणार आहे.