हिंगोली – जिल्ह्यातील सेनगाव तहसील कार्यालयांतर्गत जानेवारी २००४ ते डिसेंबर २०१८ दरम्यान झालेल्या रेशन धान्य घोटाळाप्रकरणी औरंगाबाद खंडपिठाच्या आदेशानंतर मंगळवारी सेनगाव पोलिसात हिंगोलीचे तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, सेनगावचे तत्कालीन तहसीलदार आर. के. मॅडके यांच्यासह इतर दोषी अधिकारी, महसूल कर्मचारी व स्वस्त धान्य दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेनगाव तालुक्यात शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या रेशनचा गहू व तांदळाचा जानेवारी २००४ ते डिसेंबर २०१८ या दरम्यान गैरव्यवहार झाला होता. या कालावधीत पुरवठा तहसील कार्यालयांतर्गत विभागाचे अधिकारी, रास्त भाव दुकानदारांनी संगनमत करून अभिलेखामध्ये खाडाखोड व फेरफार करून आर्थिक फायद्यासाठी मंजूर नियतनापेक्षा जास्त धान्याचे वाटप जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांनी राशन दुकानदारांना केले. यामुळे शासनाची फसवणूक झाली होती.
या घोटाळ्यात ५ हजार ९०३ क्विंटल गहू तर २ हजार ३८३ क्विंटल तांदूळ असा एकूण ८ हजार २८७ क्विंटल धान्य नियतनापेक्षा जास्त वाटप केले होते. या एकूण धान्यघोटाळ्याची किंमत तब्बल २ कोटी ८ लाख ५५ हजार ५४ रुपये एवढी होती. या धान्य घोटाळाप्रकरणी संबंधित दोषी अधिकारी व रेशन दुकानदारांवर कारवाई व्हावी, यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख अॅड. विजय राऊत यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात २०२१ मध्ये याचिका दाखल केली होती.