नगर – सीएए व एनआरसीच्या समर्थनार्थ नगरमध्ये गुरुवारी सकाळी हिंदू राष्ट्र सेनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हिंदूराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनजंय देसाई सहभागी झाले होते. माळीवाडा बसस्थानकापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून प्रारंभ झाला. मोर्चा माळीवाडा येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार असल्याने औरंगाबाद-पुणे अशी वाहतूक सक्कर चौक ते कोठी मार्ग वळविण्यात आली होती.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात तीव्र पडसाद देशभर उमटत आहेत. नगर जिल्ह्यामध्येही या कायद्याच्या विरोधात आंदोलने सुरु आहेत. मात्र,नगरमध्ये या कायद्याचे समर्थन करण्यासाठी गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. माळीवाडा बसस्थानकाजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा सकाळी अकरा वाजता सुरु झाला.
त्यानंतर हा मोर्चा सकाळी अकरा वाजता सुरु झाला. त्यानंतर हा मोर्चा मार्केट यार्ड चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेला. या मोर्चामुळे नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होवू नये.तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये,यासाठी या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली होती. प्रभारी पोलीस अधिक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आल्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा विर्सजित करण्यात आला.