‘या’ देशात उभारलं जातंय 148 कोटी रूपयांचे भव्य ‘हिंदू’ मंदिर; 11 देवतांच्या असणार ‘मुर्ती’

दुबई – दुबईत एक भव्य हिंदू मंदिर उभे राहात असून हे मंदिर ऑक्‍टोबर 2022 मध्ये दिवाळीच्या दिवशी लोकांना दर्शनासाठी खुले केले जाणार आहे. दुबईच्या जबेल अली भागात गुरू नानक दरबार जवळच या भव्य मंदिराची उभारणी सुरू करण्यात आली आहे.

148 कोटी 86 लाख 24 हजार रूपये खर्चून हे मंदिर उभारले जात असून ते 25 हजार चौरस फूट जागेवर असेल. या मंदिराचे एक प्रमुख विश्‍वस्त राजू श्रॉफ यांनी सांगितले की मंदिर उभारणीचे काम प्रगती पथावर असून त्याच्या बेसमेंटचे स्ट्रक्‍चर पुर्ण झाले आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात या मंदिराचा पायाभरणी समारंभ झाला होता.

या मंदिर संकुलातच चर्च, नानक दरबार आणि हिंदू मंदिर यांची उभारणी केली जाईल. हिंदू मंदिरात एकूण 11 देवतांच्या मुर्ती असणार आहेत. मंदिराचे बाह्य रूप अरेबियन संस्कृती प्रमाणे असणार आहे.

संयुक्त अरब अमिराती सरकारच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची आमची ही खास पद्धत आहे असेही श्रॉफ यांनी सांगितले. प्रत्यक्ष मंदिर हिंदू वास्तुशास्त्राप्रमाणे उभारले जात आहे. त्यातील स्तंभ आणि अंतर्गत स्वरूप हे गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या धर्तीवर असेल. मंदिराचा घुमट उत्तर भारतीय शैलीचा असेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.