APY : ‘अटल पेंशन योजने’त घरबसल्या उघडा खाते, 60 वर्षानंतर मिळेल आजीवन पेंशनचा लाभ

नवी दिल्ली – आपले भविष्य आर्थिक दृष्टीने सुरक्षित करण्यासाठी तुम्ही केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेचा (Atal Pension Yojana) लाभ घेऊ शकता. या योजनेंतर्गत आपल्याला सेवानिवृत्तीच्या वयानंतर थोडीशी बचत आणि गुंतवणूकीची मोठी मदत होईल. या सरकारी योजनेतील ग्राहकांची संख्या सुमारे 2.50 कोटीच्या आसपास आहे. अटल निवृत्तीवेतन योजनेंतर्गत असंघटित क्षेत्रातील लोकांना मासिक पेन्शन दिली जाते. गरीब आणि श्रमिक वर्गातील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामुळेच वृद्धत्व आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी ही योजना अनेकजण निवडतात.

फक्त 42 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करा –

यावर्षी ऑक्टोबरच्या शेवटी ग्राहकांच्या संख्येत 34.51 टक्के वाढ झाली आहे. खास गोष्ट म्हणजे या योजनेत तुम्ही प्रति महिना अवघ्या 42 रुपयांत आजीवन पेन्शनचा लाभ घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 18 वर्ष या योजनेत सहभागी व्हावे लागेल. यानंतर, प्रति महिना 42 रुपये भरून वयाची 60 वर्षे ओलांडल्यानंतर तुम्हाला प्रति महिना 1 हजार रुपये पेन्शन मिळेल. तसेच जर तुम्ही महिन्यात 210 रुपये जमा केले तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपये पेन्शन मिळेल.

या लोकांना मिळतो पेन्शनचा लाभ –

वृद्धावस्थेत उत्पन्नाची सुरक्षा प्रदान करणे हे अटल निवृत्तीवेतन योजनेचे उद्दीष्ट आहे. यामध्ये वयाच्या 60 वर्षांनंतर किमान निवृत्तीवेतनाची हमी दिली जाते. देशातील कोणताही नागरिक वयाच्या 18 ते 40 वर्षांच्या कालावधीत ही योजना घेऊ शकतो. योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे भागधारकाच्या मृत्यूनंतर पेंशन त्यांच्या पती\पत्नीस दिली जाते. तसेच जर दुर्दैवाने दोघांचाही मृत्यू झाल्यास पेन्शन फंडामध्ये जमा केलेली रक्कम नामनिर्देशित व्यक्तीला दिली जाते.

मृत्यूनंतरही होतो योजनेचा फायदा-

जर या योजनेशी संबंधित एखाद्या व्यक्तीचा 60 वर्षापूर्वी मृत्यू झाला तर त्याची पत्नी या योजनेत पैसे जमा करू शकते आणि 60 वर्षानंतर दरमहा पेन्शन मिळवू शकते. याला दुसरा पर्याय देखील आहे, तो म्हणजे, त्या व्यक्तीची पत्नी तिच्या पतीच्या मृत्यूनंतर एक रकमी रकमेचा दावा करू शकते. जर पत्नीचेही निधन झाले तर नामनिर्देशित व्यक्तीला एक रकमी रक्कम दिली जाते.

इंटरनेट बँकिंगशिवाय उघडता येते खाते –

लवकरच बचत खाते धारकांना इंटरनेट बँकिंगशिवाय अटल पेन्शन योजनेत (APY) खाते उघडता येणार आहे. पेन्शन फंड रेगुलेटरी अॅंड डेव्हलपमेंट अॅथाॅरिटी (PFRDA), APY-POPs यांना त्यांच्या विद्यमान बचत खातेधारकांना ऑनलाइन APY खाती उघडण्यासाठी पर्यायी मार्ग ऑफर करण्यास परवानगी देत ​​आहे. नवीन माध्यमांतर्गत इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल अ‍ॅपशिवाय APY खाते उघडू शकणार आहेत.

काय आहे नवीन मार्ग ?

अटल पेन्शन योजनेसाठी 5 टप्प्यात अर्ज करता येतो. यासाठी तुम्हाला मोबाईल अ‍ॅपवर किंवा https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html संकेतस्थळावर जावे लागेल. यानंतर, आपल्याला एपीवाय अॅप्लिकेशनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्या आधार कार्डाचा तपशील टाइप करा. यानंतर आधारीशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी भरल्यानंतर आणि बँकेचा तपशील दिल्यानंतर पत्ता टाइप करा. बँक या तपशिलाची पडताळणी करेल आणि त्यानंतर खाते सक्रिय होईल. यानंतर आपण नामनिर्देशित व प्रीमियम जमा करण्याबद्दल माहिती देऊ शकता. व्हेरिफिकेशनसाठी फाॅर्मवर ई-साइन केल्यानंतर अटल पेन्शन योजनेसाठी तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.