लाहोर – पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील आणखी एका हिंदू मंदिरावर हल्ला करण्याचा प्रकार घडला आहे. रहिम यार खान जिल्ह्यातील भोंग जिल्ह्यात एक जुने गणेश मंदिर असून तेथे शेकडो लोकांच्या जमावाने लाठ्याकाठ्यांसह नुकताच हल्ला चढवला. त्यात गणेशाच्या मूर्तीचीही विटंबना करण्यात आली.
एका आठ वर्षांच्या हिंदू मुलाने मुस्लिमांच्या एका शिक्षण संस्थेच्या दारात लघुशंका केल्याचा प्रकार नुकताच घडला होता. या मुलाला अटकही करण्यात आली होती, पण कोर्टाने त्याला नंतर सोडून दिल्याने जमाव संतप्त बनला होता त्यातून हा मंदिरावरील हल्ल्याचा प्रकार घडला असे सांगण्यात येते. दरम्यान, पोलिसांनी मंदिरावरील हल्ला प्रकरणात 85 जणांना अटक केली. त्यांच्या विरोधात दहशतवाद प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
त्यांना भवाळपूर येथील नव्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. सरकारने त्यांच्याकडून दहा लाख रुपयांची नुकसानभरपाईही वसुल केली आहे. या प्रकरणात एकूण दीडशे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंदिराच्या मोडतोडीच्या प्रकरणात सरन्यायाधीश गुलझार अहमद यांनी तीव्र खेद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अशा घटनांमुळे देशाची प्रतिमा मलीन होत असते. या प्रकरणात पोलिसांनी मूक निदर्शक बनत कोणतीही कारवाई केली नाही, याबद्दलही सरन्याधीशांनी नाराजी व्यक्त केली.