धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल आणि करण देओलचा लीड रोल असलेल्या “अपने 2′ चे शूटिंग सप्टेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे. “अपने 2′ चे शूटिंग याच वर्षी मार्च महिन्यात सुरू होणार होते.
मात्र, करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हे सगळे बेत फिसकटले. निर्मात्यांनी “अपने 2’चे शूटिंग लंडन आणि पंजाबमध्ये करण्याचे नियोजन केले होते. “अपने’ या गाजलेल्या सिनेमाचा हा सिक्वेल असणार आहे.
मूळ सिनेमाचे टायटल सॉंग हिमेश रेशमियाने केले होते. “अपने’ हिट होण्यामध्ये या टायटल सॉंगचा मोठा हात होता, हे दिग्दर्शक अनिल शर्मांनी मान्य केले आहे. म्हणूनच त्यांनी “अपने 2′ साठी संगीत द्यायला हिमेश रेशमियाला पाचारण केले आहे.
एखाद्या सिनेमाचा सिक्वेल बनवण्याची अनिल शर्मा यांची ही पहिलीच वेळ आहे. “अपने 2’ही एक इमोशनल स्टोरी असणार आहे. प्रेक्षकांच्या हृदयात ही स्टोरी घर करून बसणार आहे. “अपने’च्या मूळ सिनेमापेक्षाही त्याचा हा दुसरा भाग अधिक चांगला करण्याचा आपला प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले. देओल कुटुंबातील 3 पिढ्या एकत्र बघण्यास त्यांचे फॅन्सही आतूर असतील.