पुणे : ऑस्ट्रेलियन ओपन ही कॅलेंडर वर्षात होणार्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी एक आहे. ही स्पर्धा मेलबर्न शहरात जानेवारी महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात आयोजित केली जाते. 1905 मध्ये ही स्पर्धा प्रथम ऑस्ट्रेलियन चॅम्पियन्स म्हणून आयोजित करण्यात आली होते आणि दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा होती.
या ग्रँड स्लॅममध्ये पुरुष एकेरी, महिला एकेरी, मिश्र दुहेरी, व्हीलचेअर, लीजेंड्स इत्यादीसारखे विविध प्रकार आहेत. ही स्पर्धा टेनिस ऑस्ट्रेलियाद्वारे समन्वयित आणि व्यवस्थापित केली जाते.
2022 ची ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा 17 ते 30 जानेवारी दरम्यान मेलबर्न पार्क येथे होणार आहे. ऑस्ट्रेलियन ओपन ही 110 वी, ओपन एरामधील 54 वी आणि वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा असेल.
या स्पर्धेत व्यावसायिक खेळाडूंसाठी एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरीतील स्पर्धांचा समावेश असेल. ज्युनियर आणि व्हीलचेअर खेळाडू एकेरी आणि दुहेरी स्पर्धांमध्ये भाग घेतील. नोवाक जोकोविच आणि नाओमी ओसाका हे अनुक्रमे पुरुष एकेरी आणि महिला एकेरीमध्ये गतविजेते आहेत.या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅमबद्दल काही मनोरंजक तथ्ये या लेखाजून जाणून घेणार आहोत.
1) ऑस्ट्रेलियन ओपनचा इतिहास
ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा पहिल्यांदा 1905 मध्ये खेळवण्यात आली होती. ऑस्ट्रेलियन ओपनचे स्पर्धा 1969 पर्यंत ऑस्ट्रेलियन चॅम्पियनशिप म्हणून ओळखली जात होती. त्यानंतर या स्पर्धेचे ऑस्ट्रेलियन ओपन असे नामांतर करण्यात आले.
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा पूर्वी ऑस्ट्रेलियातील वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजीत केली जायची. परंतु 1987 पासून ही स्पर्धा मेलबर्नमध्येच खेळवण्याचा निर्णय झाला. यातील खास बाब अशी आहे की, ऑस्ट्रेलियन ओपनचे 1906 आणि 1912 मध्ये न्यूझीलंड येथे आयोजन करण्यात आले होते.
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये 1946 पर्यंत परदेशी खेळाडू सहभागी होत नव्हते. मात्र जशी जशी या स्पर्धेची लोकप्रियता वाढत गेली तसे तसे या स्पर्धेत सहभागी होणार्या परदेशी खेळाडूंची संख्या वाढत गेली. या स्पर्धेतून लोकप्रिय झालेल्या काही मान्यताप्राप्त खेळाडूंमध्ये रॉड लेव्हर, मार्गारेट स्मिथ आणि रॉय इमर्सन यांचा समावेश आहे.
2) ग्रास कोर्ट ते हार्ड कोर्ट असा प्रवास
1905 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन सुरू झाली तेव्हा ही स्पर्धा ग्रास कोर्टवर खेळवली जायची. ही परंपरा पुढे 1987 पर्यंत प्रचलित होती. मात्र, 1988 पासून, ग्रास कोर्ट्सऐवजी हार्ड कोर्ट्स सादर करून स्पर्धेने पहिला बदल केला.
ग्रास कोर्ट तसेच हार्ड कोर्टवर विजेतेपद पटकावणारा एकमेव खेळाडू होण्याचा विक्रम मॅट्स विलँडरच्या नावावर आहे. सध्या ही स्पर्धा मेलबर्नच्या हिसेन्स अरेना आणि रॉड लेव्हर अरेना या दोन मुख्य कोर्टवर खेळवली जाते.
3) ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेते
1905 मध्ये स्पर्धेची सुरुवात झाल्यापासून, ऑस्ट्रेलियन ओपनने खूप मोठा पल्ला गाठला आहे. टेनिसमधील कौशल्य आणि प्रतिभेच्या प्रदर्शनासाठी ऑस्ट्रेलियन ओपनला जागतिक मंच म्हणून ओळखले जाते.
या स्पर्धेने आजपर्यंत अनेक चॅम्पियन खेळाडू घडवले आहेत. यामध्ये काही महत्त्वाच्या पुरुष दिग्गजांमध्ये केनेथ रॉबर्ट रोझवॉल, रॉय स्टॅनली इमर्सन, मॅट्स विलँडर, रॉड लेव्हर, आंद्रे अगासी, राफेल नदाल, नोव्हाक जोकोविच आणि रॉजर फेडरर यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या महिला दिग्गजांमध्ये मार्गारेट स्मिथ, नॅन्सी वाईन बोल्टन, स्टेफी ग्राफ, इव्होन गुलागॉन्ग, थेल्मा कोयने आणि मार्टिना हिंगीस यांचा समावेश आहे.
4) ग्रँड स्लॅम स्पर्धेत सर्वाधिक वेळ चाललेला अंतिम सामना
नोव्हाक जोकोविच आणि राफेल नदाल यांच्यात 2012मध्ये झालेला ऑस्ट्रेलियन ओपनमधील अंतिम सामना, ग्रँड स्लॅम स्पर्धेचा आतापर्यंतचा सर्वाधिक वेळ चाललेला सामना होता. जोकोविच आणि नदाल यांनी यापूर्वी 1988 च्या यूएस ओपन फायनलमध्ये मॅट्स विलँडर आणि इव्हान
लेंडल यांनी नोंदवलेला विक्रम मोडीत काढला होता. या सामन्यात जोकोविच-नदालने तब्बल 5 तास 53 मिनिटे एकमेकांना टक्कर दिली होती. अखेर या सामन्यात नोव्हाक जोकोविचने विजेतेपद मिळवले.
5) ऑस्ट्रेलियन ओपनबद्दल इतर खास बाबी
*केन रोजवॉल 18 व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा सर्वात तरुण विजेता आहे
*मार्गारेट कोर्ट सर्वाधिक वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी महिला खेळाडू आहे.
*मार्टिना हिगिन्स वयाच्या 16 व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी सर्वात तरुण महिला खेळाडू आहे.