सातारा –सातारा जिल्ह्यात जानेवारी महिन्यातील उच्चांकी 1119 करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात बाधितांचा पॉझिटिव्हीटी रेट 22 टक्क्यांवर गेला आहे. गेल्या चोवीस तासात चार बाधितांचा मृत्यू झाला आहे. बाधितांच्या वाढत्या संख्येने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे.
करोना आणि ओमायक्रॉन अशा दुहेरी संकटाचा सामना आरोग्य विभाग करत आहे. बाधित रुग्णांचा प्रसार रोखण्यासाठी व गैरसोय टाळण्यासाठी तालुकानिहाय करोना सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतल्याने रुग्णांना आधार मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दोन लाख 59 हजार 385 जण करोना बाधित आढळून आले असून दोन लाख 46 हजार 468 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सहा हजार 512 नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात पाच हजार 79 चाचण्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये 1189 बाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान चार बाधितांचा मृत्यू झाला आहे. चार हजार 573 सक्रिय रुग्ण असून पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. सध्या 215 बाधित विविध रुग्णालयात दाखल आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी दिली.