- समन्वयासाठी उपायुक्त व इतर अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेने स्मशानभूमी समन्वयक हेल्पलाईन सुरू केली आहे. करोना रुग्णांच्या अंतिम संस्काराची प्रतिक्षा कमीत कमी व्हावी, या उद्देशाने महापालिकेने याची स्थापना केली आहे. ही सुविधा तीन शिफ्ट मध्ये 24 तास सुरु राहणार आहे. महापालिका उपआयुक्त मंगेश चितळे यांनी पूर्ण कामकाजाचे नियोजन व समन्वय केले आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
सद्यस्थितीमध्ये शहरामध्ये कोविड -19 प्रादुर्भावामुळे मृतांची संख्या वाढत आहे. शहरामध्ये सांगवी, भोसरी, पिंपरी, भाटनगर, निगडी, नेहरुनगर आदी ठिकाणी शवदाहिनी आहेत. त्याठिकाणी वाढती वेटींग पाहता कोविडने मृत्यू झालेल्या नागरिकांचा पारंपारिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय महापालिकेने यापूर्वीच घेतलेला आहे. परंतु, तरी सुध्दा बऱ्याच ठिकाणी अंतिम संस्कारांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
यासाठी प्रशासनाने स्मशानभूमी समन्वयक हेल्पलाइन सुरू केली आहे. महापालिकेकडून माहितीसाठी 020-67331155 हा क्रमांक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ज्या कोविड रूणांचा मृत्यू झालेला आहे त्याचा दाखला महापालिकेमार्फत देण्यात येतो. त्यावळी सबंधित कर्मचारी महापालिकच्या हेल्पालाइनवरती फोन करून कोणत्या ठिकाणी अंतिम संस्काराची वेटींग कमी आहे याची विचारणा करू शकतात. त्या स्मशानभूमीची त्याना जागा सांगितली जाणार आहे.
या कामकाजासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या असून याबाबत उपायुक्त मंगेश चितळे यांनी कामकाजाचे नियोजन व समन्वय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या समितीमध्ये लिपिक सुनिल विटकर, अभियांत्रिकी सहाय्यक ललित हेडाऊ, रोहित पायगुडे राहुल गायकवाड यांचा समावेश आहे.