पुणे –खासदार सुप्रिया सुळे यांच्याप्रमाणेच रुपाली पाटील याही आता माझी बहीण असून, भावाच्या नात्याने मी सर्वतोपरी मदत करेन, अशा शब्द राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाटील-ठोंबरे यांच्या पक्षप्रवेशावेळी दिला. तुमच्या मनात, “आपण आगीतून उठून फुफाट्यात पडलो का?’ अशी भावना येऊ दिली जाणार नाही. काम करा, नाउमेद होऊ नका. तसे तुमच्या रक्तातही नाही. रुपाली पाटील यांना आमच्या सगळ्यांकडून भावाच्या नात्याने मदत केली जाईल. पक्षातील बाकीच्या भगिनी जशा पुढे चालल्या तशाच पद्धतीने या देखील पुढे वाटचाल करत राहील. आमचे सहकार्य, पाठींबा आणि मदत नक्कीच राहील याची ग्वाही देतो, असे पवार म्हणाले.
पाटील कुठे जाणार याची प्रसार माध्यमांमध्ये बरीच चर्चा होती. स्थानिक नेतेही त्यांना पक्षात घेण्याबाबत आग्रही होते, त्यांची कामाची पद्धत गेल्या 10 वर्षांपासून पाहात आहे. पक्षात कोण आता आला, कोण पहिल्यापासून आला, कोण मध्ये आला असा भेदभाव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात केला जात नाही. धनंजय मुंडेंना जेव्हा राष्ट्रवादीत आणले तेव्हा अनेकांना प्रश्न पडला की त्यांचे काय होणार? पण त्यांच्यावर विरोधीपक्षनेत्याची जबाबदारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी सोपवली. त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली, असे पवार म्हणाले.