शहर पाण्यात : 2 तासांत 81 मिलिमीटर
हंगामीपेक्षा परतीच्या पावसाचाच जोर
पुढील दोन दिवस मोठ्या पावसाचा अंदाज
पुणे – शुक्रवारच्या विक्रमी पावसानंतर पुणेकर सावरत नाहीत, तोच सोमवारी रात्री अतिमुसळधार पावसाने पुणे आणि पिंपरी चिंचवडला झोडपले. पावसाचा आवेग इतका प्रचंड होता, की काही मिनिटांत रस्ते पाण्याखाली गेले. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरावर 9 ते 11 कि.मी. उंचीचे ढग होते. त्यामुळे कमी काळात मुसळधार पाऊस झाला. हे प्रमाण हंगामातील उच्चांकी ठरले असून, 2 तासांत 81 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
परतीच्या पावसाचा हंगाम असताना पुण्यासह राज्यभरात अतिवृष्टीसदृश पाऊस होत आहे. तर, मागील काही दिवसांत बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राच्या काही भागांत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील दोन दिवस पावसाची शक्यता कायम असून, त्यानंतर त्याची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे.
शहरात सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. दोन तासांपेक्षा अधिक वेळ कोसळणाऱ्या पावसाने रस्ते जलमय झाले. मांजरी, मुंढवा, हडपसर, फुरसुंगी, उंड्री-पिसोळी, कात्रज, धनकवडी, मार्केटयार्ड-बिबवेवाडी, आंबेगाव, धायरी-नऱ्हे, वारजे, कोथरूड, बावधन, बालेवाडी, औंध, शिवाजीनगर, डेक्कन, अलका टॉकीज आणि केळकर रस्ताही पाण्याखाली गेला. तर, पूर्व भागांतील येरवडा, कळस, विश्रांतवाडी, धानोरी, लोहगाव भागांतही मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे झोपडपट्टीसह सखल भागांत पाणी साचले आणि घरांमध्येही पाणी शिरले.
दगडूशेठ गणपतीसमोर पाणीच पाणी
शिवाजी रस्त्यावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर सुमारे अडीच-तीन फूट पाणी वाहत होते. जणू नदी वाटावी, असे भीषण दृश्य तेथे होते. स्वारगेट चौकातही वाहतुकीला अडथळे निर्माण झाले. उपनगरांतही अशीच स्थिती होती. सिंहगड रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. विश्रांतीनगर-विठ्ठलवाडी चौक, अभिरुची मॉल येथे पाण्याचा लोंढा इतका तीव्र होता की वाहनचालकांना थांबून राहावे लागले.
पिंपरी-चिंचवडलाही झोडपले
पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातही पावसाने जबर तडाखा दिला. शहरातील सर्वच उपनगरांत पावसाने धुमाकूळ घातला. ही तीव्रता इतकी होती, की पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, भोसरी, काळेवाडी, पिंपळे गुरव, सांगवी परिसर पाण्याखाली गेला. यामुळे नागरिकांना आडोसा शोधून थांबावे लागले.