पुणे – मार्केटयार्ड, गेट नंबर एक, हॉटेल रेवळ सिद्धी येथे आग लागल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्री सव्वा १ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाला तत्काळ पाचारण करण्यात आले. आगीबाबतची माहिती मिळताच दलाकडून गंगाधाम, कोंढवा खुर्द आणि मुख्यालयातून एक फायरगाडी व जंम्बो वॉटर टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आले.
घटनास्थळी जवान पोहोचताच त्यांनी पाहिले की, सदर ठिकाणी दोन मजले असणाऱ्या इमारतीत हॉटेलमधे आग लागली होती. शटर आतमधून कुलुपाने बंद असून 3 कामगार पोटमाळ्यावर अडकल्याचे समजले असता जवानांनी तातडीने बोल्डकटर या अग्निशमन उपकरणाने शटर तोडून बी ए सेट परिधान करत आतमधे पोटमाळ्यावर प्रवेश केला. कोणताही अतिरिक्त वेळ न घालवता जवानांनी आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. तिथे अडकलेल्या 3 जखमी कामगारांना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढण्यात आले.
या सर्व कामगारांना उपचारासाठी शासकीय रुग्णवाहिका क्रमांक १०८ मधून ससून रुग्णालयात रवाना करण्यात आले. मात्र यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अन्य एकावर उपचार सूर्य आहेत.
पुढे कार्यवाही करत आग पुर्ण विझवली. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आग तळमजल्यावरील भटारखान्यातून सुरू झाली व मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला होता. या ठिकाणी असलेले चार सिलेंडर देखील बाहेर काढण्यात आले.
या कामगिरीत अग्निशमन दलाचे अधिकारी गजानन पाथ्रुडकर, प्रदिप खेडेकर, सुनिल नाईकनवरे तसेच तांडेल मनिष बोंबले, मंगेश मिळवणे व फायरमन दिगंबर बांदिवडेकर, चंद्रकांत गावडे, आझीम शेख यांनी सहभाग घेतला.