सातारा -जिल्हा रुग्णालयात सुरु आहे आरोग्याचा बाजार

Madhuvan

सातारा -जिल्हा प्रशासनाची जिल्ह्यात करोनाशी झुंज सुरु असताना करोनाच्या निमित्ताने काही महाभागांनी आरोग्य व्यवस्थेचा बाजार मांडला आहे. करोना रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेत मोफत उपचार सुरु असताना काही दलालांकडून येथील ऑक्‍सिजन बेडचा दहा ते पंधरा हजार रुपयांमध्ये अक्षरशः लिलाव केला जात आहे. करंजे गावठाणातील एका रुग्णाला बेडसाठी चक्क सतरा हजार रुपये मोजावे लागल्याने आरोग्य यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

दरम्यान इतके पैसे मोजूनही जिल्हा रुग्णालयात काहीच उपचार न मिळाल्याने हा रुग्ण वैतागून साताऱ्यात खासगी रुग्णालयात दाखल झाला. जिल्हा रुग्णालयातील हे झारीतले शुक्राचार्य जिल्हाधिकाऱ्यांनी शोधून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. करोनाबाधितांची संख्या जिल्ह्यात एकतीस हजाराच्या वर पोहचली असून करोना बळींची संख्यासुद्धा नऊशेहून अधिक झाली आहे. करोनाचे संक्रमणं रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे हरतऱ्हेचे प्रयत्न सुरु आहेत.

मात्र, जिल्हा रुग्णालयात करोना रुग्णांना नाडून त्यांच्याकडून ऑक्‍सिजन बेडसाठी पंधरा ते वीस हजार रुपये उकळले जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. ही दलालांची टोळी अत्यंत गोपनीय शिस्तबद्ध रितीने काम करत असून आरोग्य व्यवस्थेचे काही पांढरपेशे कर्मचारी व वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरले जात आहे. बेड मिळवायचा असेल तर पैसे मागण्याच्या निमित्ताने “चहापाणी’ या सांकेतिक शब्दातून रुग्णांना थेट ऑफर केली जात आहे.

करोनाच्या दहशतीने रुग्णाचे नातेवाइक वाटेल तेवढे पैसे मोजायला तयार असतात. त्यांच्या या असहाय्यतेचा फायदा घेऊन तुंबडी भरणारे काही मिजासखोर रुग्णालयात सोकावले आहेत. करंजे आणि तामजाईनगर येथील काही रुग्णांना झटपट बेड मिळवण्यासाठी मोफत उपचार देणाऱ्या जिल्हा रुग्णालयातच चक्क 17 हजार रुपये मोजावे लागले.

पैसे घेणारी व्यक्ती रुग्णालयाशी संबंधित नव्हती. मात्र, आरोग्य व्यवस्थेत वरिष्ठ पातळीवरील वरिष्ठांशी खास संबंध असल्याचे बतावणी त्याने केली. मात्र, जुजबी उपचाराव्यतिरिक्त त्या रुग्णाच्या पदरात काहीच पडले नाही. लगतच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने घाबरलेल्या त्या रुग्णाने खासगी हॉस्पिटलचा रस्ता धरला. मात्र, या रुग्णाने झालेल्या आर्थिक छळाचा सर्व वृतांत “प्रभात’ सांगितला. जिल्हा रुग्णालयात 128 बेडची व्यवस्था असताना प्रत्यक्षात 149 रुग्ण तेथे करोनावर उपचार घेत आहेत.

रुग्णालयात जीवन मृत्यूचे चक्र सुरु असताना काही पांढरपेशे व दलालांच्या टोळीचा हा बाजार साताऱ्याच्या आरोग्य व्यवस्थेला शरमेने मान खाली घालायला लावणारा आहे. करोनाच्या सहा वॉर्डात राउंडवर येणारे ठेक्‍यावरचे डॉक्‍टर रुग्णांशी काहीच देणेघेणे नसल्याप्रमाणे वावरतात आणि आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी अपवाद वगळता मात्र आरोग्य यंत्रणेची बजबजपुरी उघड्या डोळ्यांनी पाहत असतात.

टोळीचे एजंट वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांमध्ये बेमालूमपणे मिसळत बेडच्या सौद्याचा व्यवहार पदरात पाडून घेतात. येथील खाऊ व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या अधिकाऱ्यांना एकटे पाडले जाते. या भ्रष्ट व्यवस्थेचा बुरखा येथे फाडायचा प्रयत्न झाल्यास “दृश्‍यम’ पद्धतीने तक्रार करणाराच कसा बिनबुडाच्या तक्रारी करतो यांची कुंडली मांडली जाते. करोना वॉर्डाच्या तीन शिफ्टमधील राउंडचा घोळ सुरु असून डॉक्‍टर रुग्णांकडे फिरकत नसल्याची तक्रार आहे.
आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून येथील पाच डॉक्‍टर राजीनामा देण्याच्या मनःस्थितीत असल्याची माहिती आहे.

चव्हाणसाहेब, पाळेमुळे उखडून काढा…
जिल्हा रुग्णालयात दर्जेदार व मोफत सेवा रुग्णांना कशी मिळेल यावर डॉ सुभाष चव्हाण यांचा कटाक्ष असणे गरजेचे आहे. मात्र, साहेबांपुढे हुजरे आणि मुजरे करणाऱ्यांनी गर्दी केल्याने जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांचा पगार गेल्या तीन महिन्यांपासून झाला नाही. जिल्हा रुग्णालयात बेड हाऊसफुल आहेत.

दहा बेडचा आणखी एक अतिदक्षता विभाग डॉ. चव्हाण यांच्या प्रयत्नाने सुरु होत असताना तेथेही लिलाव करणाऱ्या टोळीने सेटिंग लावल्याची चर्चा आहे. या टोळीचा म्होरक्‍या शोधून जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्याबाबतचे रामबाण औषध द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.