बॉलीवूडमध्ये सुरुवातीच्या काळात चित्रपटातील नायक किंवा नायिका होण्यासाठी रंग आणि रूप यावर विशेष लक्ष दिले जात होते. जर कोणी सावळा असेल तर त्याला जास्त संधी मिळत नसे. तसेच जुन्या चित्रपटांमध्ये नायकदेखील हिरोईनसारखे मेकअप करायचे.
अजय देवगणने जेव्हा हिरो होण्याचा विचार केला, तेव्हा अनेकांनी त्याची टिंगल केली होती. अजयचा चेहरा सर्वसामान्य आहे आणि त्याने कधीही ते नाकारले नाही. उलटपक्षी, त्याने इतर सुंदर व देखण्या अभिनेत्यांपेक्षा अधिक यश मिळविले आहे.
फाइटमास्टर वीरू देवगण यांचा मुलगा अजय याने जेव्हा “फूल और कांटे’ चित्रपट साईन केला तेव्हा अनेकांनी हा चित्रपट फ्लॉप ठरेल असा अंदाज वर्तविला होता. तसेच अनेकांनी त्याची खिल्ली उडविली होती; परंतु अमिताभ बच्चन यांचे मत वेगळे होते. बिग बीने चेहऱ्यामागील अभिनेता ओळखला होता. त्यांनी अजयला “डार्क हॉर्स’ म्हटले होते.
त्यानंतर अमिताभ बच्चन यांची भविष्यवाणी खरी ठरली आणि पहिल्या चित्रपटापासूनच अजय देवगण बॉलीवूडमध्ये पॉप्युलर झाला. अजय देवगणने आजपर्यतच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आजही त्याच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळत आहे.