उंब्रज पोलिसांनी घडविले माणुसकीचे दर्शन
उंब्रज – गेली आठ ते दहा दिवस मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा, कोयना नद्यांनी रौद्ररूप धारण केल्यामुळे सर्वांच्या हृदयात धडकी भरली होती. कोयना धरणातून होणारा विसर्ग व कृष्णा नदीने धोक्याची पातळी गाठल्यामुळे नदीकाठ जलमय झाला होता.
पाणी साठून महामार्ग बंद झाले होते तर उंब्रज ते खोडशी या मार्गावर हजारो गाड्या दोन ते तीन दिवस उभ्या होत्या. या अडकून पडलेल्या वाहनधारकांना उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या. तर उंब्रज पोलीस स्टेशनच्यावतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह महामार्गावरील वाहनधारकांना आवश्यक त्या सुविधा पुरवित पोलीसांमधील माणुसकीचे दर्शन घडविले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार यांनी आपल्या पथकासह महामार्गावरील ट्रक चालकांची आरोग्य तपासणी केली. उंब्रज ते खोडशी दरम्यान पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर पूरपरिस्थिती असल्याने पुढे कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेल्यामुळे उंब्रज आणि तळबीड पोलीसांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव या मार्गावरील मालवाहतूक करणारे ट्रक रोखून धरले होते.