आरोग्य हृदयाचे : कमकुवत हृदय

सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर हृदय हे शरीराचा मोटर पंप असते. हृदय कार्यक्षीणता म्हणजे हृदयातील स्नायू शरीराच्या गरजेनुसार आवश्‍यक तेवढे रक्त पंप करू शकत नाहीत. हृदय कार्यक्षीण होण्याचे अनेक प्रकार असतात. यासाठी सर्वप्रथम आपल्याला हृदयाची रचना समजून घ्यावी लागेल. आपल्या हृदयात चार कप्पे असतात. दोन उजव्या बाजूला असतात आणि दोन डाव्या बाजूला असतात. त्यामुळे जेव्हा उजव्या बाजूचे कप्पे निकामी होतात तेव्हा उजव्या बाजूचे हृदय निकामी झाले असे म्हणतात तर जेव्हा डाव्या बाजूचे कप्पे निकामी होतात, तेव्हा डाव्या बाजूचे हृदय निकामी झाले असे म्हणतात.

त्याचप्रमाणे आपल्याला हृदयातील स्नायूंची कार्यपद्धती जाणून घ्यावी लागेल. हे स्नायू आकुंचन आणि प्रसरण पावत असतात. त्यामुळे जेव्हा स्नायू आकुंचित होण्याला अडथळा निर्माण होतो, तेव्हा आम्ही त्याला सिस्टॉलिक फेल्युअर असे म्हणतो आणि जेव्हा स्नायू प्रसरण पावण्याला अडथळा निर्माण होतो, तेव्हा त्याला डायास्टॉलिक फेल्युअर असे म्हणतात.

कारणे : हृदय कार्यक्षीण होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असू शकतात. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या निर्माण होणे, उच्च रक्तदाब, हृदयातील झडपेला इजा होणे, हृदयाच्या स्नायूंमध्ये असाधारण कण साचणे, फुप्फुसातील रक्तवाहिनीचे एम्बोलायझेशन (संरोध) ही कारणे असू शकतात. यापैकी काही आजार बरे करता येऊ शकतात आणि काही प्रकारांमध्ये प्रकृती पूर्ववत होणे शक्‍य नाही. त्यामुळे हृदय निकामी होण्यासाठीचे नक्की कारण शोधून काढण्यासाठी आम्हाला पुढील चाचण्या करण्याची आवश्‍यकता असते.

लक्षणे : लक्षणांचा विचार करता हृदय अचानक बंद पडण्याच्या क्रियेला आम्ही ऍक्‍युट हार्ट फेल्युअर म्हणतो. या परिस्थितीत तुम्ही काही तासांपूर्वीपर्यंत सामान्य असता आणि त्यानंतर तुम्हाला धाप लागते, हृदयाचे ठोके धडधडतात, श्वास अडकतो, खोकला येतो. पायाला सूज येते. तुम्हाला थकवा येतो किंवा अशक्तपणा जाणवू लागतो. हृदयविकाराचा झटका आला असेल तर छातीत दुखते.

छातीत दुखत असेल, घेरी येत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल, हृदयाचे ठोके अनियमित असतील किंवा धडधडत असतील, अचानक व खूप धाप लागत असेल आणि गुलाबी रंगाचा फेसयुक्त कफ बाहेर पडत असेल, तर तुम्ही ताबडतोब डॉक्‍टरकडे जावे. हृदय बंद पडण्याच्या सौम्य प्रकारांना क्रॉनिक म्हटले जाते. जेव्हा तुम्हाला ऍक्‍युट हृदय कार्यक्षीणतेची नाट्यमय लक्षणे जाणवत नाहीत, पण तरीही हृदयक्रिया क्षीण होत असते तेव्हा तुमच्या शरीरात हळुवारपणे काही बदल होत असतात. काही दिवस तुम्हाला फार बरे वाटत असेल, तर काही दिवस अशक्तपणा जाणवत असेल आणि थकवा येत असेल. तुमचे वजनही वाढेल. वैद्यकीय भाषेत तुमच्या शरीरात पाणी साठत जाईल. आपल्या शरीरात नक्की काय बदल होतोय हे जाणून घेण्यासाठी डॉक्‍टरची भेट घ्या. दुर्लक्ष करू नका.

उपचार : मी वर नमूद केल्याप्रमाणे हृदय कार्यक्षीणतेच्या बहुतेक कारणांवर उपचार करता येऊ शकतात. त्यांच्यापैकी काही बरे केले जाऊ शकतात, तर काही लक्षणे बरी करता येऊ शकत नाहीत. पण, औषधांच्या माध्यमांतून त्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. काही लक्षणे मात्र, औषधांनी नियंत्रित करता येत नाहीत. कमाल प्रमाणात औषधे घेऊनही हदय कार्यक्षीणतेची परिस्थिती बिकट होत जाते आणि तुम्हाला अनेकदा हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागू शकते. हृदय कार्यक्षीणतेच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही रुग्णांना वर्षातून दोन-तीन वेळा हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागू शकते.

आता आम्ही या रुग्णांना एक आशेचा किरण दाखवू शकतो. गेल्या दोन दशकांमध्ये हृदय कार्यक्षीणतेवरील उपचारांमध्ये खूप सुधारणा झाली आहे. हृदय कार्यक्षीणतेसाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांनुसार या उपचारांची आखणी करण्यात आली आहे. शस्त्रक्रिया करून तुमच्या हृदयाच्या डाव्या कप्प्यांची सूज कमी करून त्यावर उपचार करू शकतो, तुमच्या हृदयाच्या झडपांवर उपचार करू शकतो. हृदय प्रत्यारोपण ही एक क्रांतिकारक सुधारणा घडून आली आहे. या शस्त्रक्रियेमुळे तब्बल 10 वर्षांपर्यंत परिणाम पाहायला मिळतात. हृदय कार्यक्षीणतेवर उपचार करण्यासाठी लहान आकाराचे मोटर पंपसुद्धा उपलब्ध आहेत.

या पंपांना एलवॅड्‌स (लेफ्ट व्हेन्ट्रिक्‍युलर असिस्ट डिव्हाइसेस) म्हणतात. हे अत्यंत लहान आकाराचे मोटर पंप हृदयाच्या डाव्या बाजूला असतात आणि रक्ताभिसरण सुरू ठेवतात. ही अत्यंत उत्साहाची बाब आहे आणि गेल्या दशकात उत्तर अमेरिकेतील अनेक केंद्रांनी परिणामांमध्ये सुधारणा झाल्याची नोंद केली आहे. जेव्हा मी उत्तर अमेरिकेत होतो, आम्ही दर आठवड्याला अशा प्रकारची 3 ते 4 यंत्रे बसवायचो. ही उपकरणे उत्कृष्ट काम करतात आणि जेव्हा औषधांचा परिणाम होईनासा होतो, तेव्हा या उपकरणांमुळे आयुर्मान वाढण्यास मदत होते.

हृदय कार्यक्षीणता या आजाराचे आयुष्यभर व्यवस्थापन करावे लागते. आधुनिक तंत्रज्ञानाने हृदय कार्यक्षीणतेसाठी अनेक नवी व्यवस्थापन उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. उपचारांनंतर हृदय कार्यक्षीणतेच्या लक्षणांमध्ये सुधारणा होऊ शकते आणि हृदय सशक्त होते. उपचारांमुळे तुमचे आयुर्मान वाढते आणि अचानक मृत्यू होण्याची शक्‍यता कमी होते.

– डॉ. चैतन्य जोशी

Leave A Reply

Your email address will not be published.