पुणे – आरोग्य विभागातील कर्मचारी भरती प्रक्रियेचा गोंधळ प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशीही कायम राहिला. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह राज्यातील अनेक ठिकाणी प्रश्नपत्रिका उशिरा मिळाल्या. चुकीच्या पदाच्या प्रश्नपत्रिका, असा ढिसाळ नियोजनाचा अनुभव परीक्षार्थींना आला. या गोंधळास जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर तातडीने कडक कारवाई करा, अशी मागणी युवासेनेचे पदाधिकारी कल्पेश यादव यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
आरोग्य विभागाची परीक्षा ही मागील महिन्यात होणे अपेक्षित होते. पण, “न्यासा’ कंपनीच्या कारभारामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली. रविवारी एकूण 17 जिल्ह्यांतील 1025 केंद्रांवर 52 संवर्गात या परीक्षा घेण्यात आल्या. मुंबईतील साकीनाका, कोल्हापूर आणि पुणे येथे प्रश्नपत्रिका फुटल्याच्या तक्रारी होत्या. नाशिक, पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे प्रश्नपत्रिका वेळेत पोहोचल्या नाहीत. आठ ठिकाणी प्रश्नपत्रिका असलेल्या पेटीचे डिजिटल लॉक न उघडल्यामुळे लॉक तोडावे लागले.
काही ठिकाणी न्यासा कंपनीचे परीक्षा पर्यवेक्षक न पोहोचल्याने ऐनवेळी आरोग्य विभागाला पर्यवेक्षक द्यावे लागले. या गोंधळात परीक्षा उशिराने सुरू झाल्या. मुळात परीक्षा घेण्याची संपूर्ण जबाबदारी न्यासा कंपनीची असताना ही परीक्षा यशस्वी व्हावी, यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लावण्यात आली होती.
त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. तसेच याबाबतच आढावा घेऊन आगामी कालावधीत अशा समस्या निर्माण होणार नाहीत याबाबत दक्षता घेण्यात यावी, अशी मागणी यादव यांनी केली आहे.