हवेली, मुळशी तालुक्‍याची स्वतंत्र बाजार समिती – आमदार अशोक पवार

पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे होणार विभाजन

लोणी काळभोर (वार्ताहर) -पुण्यातील गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यापुढील काळात फक्त हवेली तालुक्‍याचीच असणार आहे. पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करून, पूर्वीप्रमाणेच हवेली व मुळशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यास सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी तत्वतः मान्यता दिली असल्याची माहिती आमदार अशोक पवार यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी हा निर्णय घेतला असून, हवेलीकरांसाठी हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती या नावाने बाजार समिती अस्तित्वात येणार असल्याची माहिती आमदार अशोक पवार यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात हवेली व मुळशी बाजार समितीचे एकत्रीकरण करुन, दोन वर्षांपूर्वी पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन होताच, आमदार अशोक पवार व संग्राम थोपटे यांनी पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करून, पूर्वीप्रमाणेच हवेली व मुळशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवावे, अशी मागणी केली होती.

आमदार पवार म्हणाले, राज्यात प्रत्येक तालुक्‍यासाठी स्वतंत्र बाजार समिती असताना, राज्य शासनाने अडीच वर्षांपूर्वी हवेली व मुळशी या तालुक्‍यावर अन्याय करून, दोन्ही तालुक्‍यांच्या दोन वेगवेगळ्या बाजार समित्या एकत्रित केल्या होत्या. तसेच मागील पंधरा वर्षांपासून या बाजार समितीवर शासन नियुक्त प्रशासक नेमला जात होता. चार दिवसांपूर्वी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन, वरील मागणीबाबत चर्चा केली होती.

16 वर्षांनंतर हवेलीकरांच्या हाती सूत्रे 
हवेली व मुळशी या दोन बाजार समित्या स्वतंत्र झाल्यानंतर, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे शहर, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील परिसर, पुणे, खडकी, देहुरोड कॅन्टोन्मेंट आणि हवेली तालुक्‍यातील सर्व गावांचा समावेश असणार आहे. वरील निर्णयामुळे आशिया खंडात सर्वात मोठी बाजार समिती असा नावलौकीक असणाऱ्या हवेली कृषी बाजार समितीची सत्तासूत्रे तब्बल सोळा वर्षानंतर हवेलीकरांच्या हाती येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.