#HathrasCase : तुम्ही गुन्हा रोखला नाहीत तर गुन्हेगाराप्रमाणे वागलात

नवी दिल्ली/ हाथरस – उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातल्या गावामध्ये दोन आठवड्यांपूर्वी सामूहिक बलात्कार झालेल्या 19 वर्षीय पीडित महिलेचा आज दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर मध्यरात्री पोलिसांकडून पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.  या घटनेमुळे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे.

प्रियंका गांधी म्हणाल्या, ‘जेव्हा ती जिवंत होती तेव्हा तिला सरकारने कोणतीही सुरक्षा दिली नाही. जेव्हा तिच्यावर हल्ला झाला तेव्हा सरकारने वेळेवर उपचारही केले नाहीत. पीडितेच्या मृत्यूनंतर सरकारने कुटुंबीयांचा अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार काढून घेतला. मृत पीडितेला सन्मानही दिला नाही, आणि रात्री २.३० वाजता कुटुंबीय विनंती करत होते, पण उत्तर प्रदेश प्रशासनाने पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.’

त्या पुढे म्हणाल्या “तुम्ही अत्याचार रोखले नाहीत तर एका निरागस मुलगी आणि तिच्या कुटुंबावर दुप्पट अत्याचार केले. योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा दिला पाहिजे. तुमच्या कार्यकाळात न्याय नाही तर फक्त अन्याय सुरु आहे , तुम्ही गुन्हा रोखला नाहीत तर गुन्हेगाराप्रमाणे वागलात. ‘काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे.

मात्र या घटनेबाबत पीडितेच्या मृतदेह रात्री १० वाजता रुग्णालयातून बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच पोलिसांनी पीडितेच्या भावाचा आरोप फेटाळला आहे. शांती व सुव्यवस्थेसाठी आणि कुटुंबियांसोबत मध्यरात्री अंत्यसंसकार करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.  या पीडितेच्या मृत्यूमुळे संतप्त आणि तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या प्रकरणामुळे दिल्लीत गाजलेल्या निर्भया प्रकरणाचीच पुनरावृत्ती झाल्याची प्रतिक्रिया व्यक्‍त होऊ लागली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.