घर खरेदीसाठी सध्याचा काळ सुयोग्य

घराचे दर आणि व्याजही कमी पातळीवर 

नवी दिल्ली – सध्या व्याजदर कमी आहेत. विकसकांनी घरांचे दर कमी केले आहेत. त्याचबरोबर पेमेंटच्या पद्धतीत बऱ्याच सवलती दिल्या आहेत. त्यामुळे गुंतवणुकीसाठी नाही तर राहण्यासाठी घर खरेदी करण्याकरिता आगामी बारा महिने आदर्श आहेत, असे आपल्याला वाटते, असे जेएलएल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश नायर म्हणाले.

रमेश नायर म्हणाले की, पहिल्या तमिाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत मुंबई आणि दिल्लीसह मोठ्या 7 शहरातील घर विक्रीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे रिऍल्टी क्षेत्रासाठी आगामी काळ आशावादी राहण्याची शक्‍यता आहे. पहिल्या तिमाहीतील विकास दर कोसळला असला तरी आता लॉकडाउन उठल्यामुळे आगामी काळात अर्थव्यवस्थेचा विस्तार होण्याची शक्‍यता आहे. त्याचाही रिऍल्टी क्षेत्राला लाभ होऊ शकतो. बऱ्याच बॅंकाही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उत्सवाच्या काळात घर विक्री वाढण्याबाबत आपण आशावादी आहोत, असे त्यांनी सूचित केले. 

दरम्यान एप्रिल ते जून या तिमाहीच्या तुलनेत जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत घरांच्या विक्रीत 34 टक्‍क्‍यांनी वाढ होऊन या तिमाहीत देशातील 7 मोठ्या शहरात 14 हजार 415 घरे विकली गेली. एप्रिल ते जून या तिमाहीत केवळ 10 हजार 753 घरे विकली गेली होती. 

मात्र गेल्या वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीच्या तुलनेत या वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत घर विक्री 61 टक्‍क्‍यांनी कमी होऊन ते केवळ 14 हजार 415 इतकी झाली आहे. गेल्या वर्षी पुण्यासह दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकत्ता या सात शहरात 36 हजार 826 घरांची विक्री झाली होती.

पुण्यात 1,344 घरांची विक्री
जेएलएल या संस्थेने जारी केलेल्या माहितीनुसार जुलै- सप्टेंबर या तिमाहीत पुण्यात 1,344, बंगळुरूत 1,742, चेन्नईत 1,570, दिल्लीत 3,112, हैदराबादेत 2,122, कोलकात्त्यात 390 मुंबईमध्ये 4,135 घरांची विक्री झाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.