मुंबई – विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज औरंगाबाद दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी झालेल्या छापेमारीबाबत प्रतिक्रिया दिली.
अजित पवार म्हणाले की, अशाप्रकारे सूडबुद्धीने कारवाई करणे तसेच फक्त ठरवून काही पक्षांवर अशी कारवाई करणे योग्य नाही. नाहक त्रास कोणाला होता कामा नाही. हे सर्व प्रकार देशाला आणि राज्याला परवडणारे नाहीत, असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. जंयत पाटील म्हणाले की, यापूर्वीदेखील मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आयकर विभागाची धाड टाकण्यात आली होती. त्यावेळी काही निष्पन्न झाले नाही.
Hasan Mushrif ED Raid : जयंत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, “काही लोकांकडून…”
आताही ईडीकडून धाड टाकण्यात आली. मात्र विरोधी पक्षातील जे लोक सातत्याने ठामपणे सरकारविरोधात उभे राहतात त्यांच्या विरोधात विविध केंद्रीय यंत्रणांचा वापर करून त्यांना बदनाम किंवा नामोहरम करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होतोय, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.