मुंबई – विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यासाठी कॉंग्रेस 2, राष्ट्रवादी 1, शेकाप 1 आणि शिवसेना 1 जागेवर निवडणूक लढवणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, कॉंग्रेसने नागपूर येथे असलेला पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेला बहाल केला आहे.
अमरावती आणि नाशिकची जागा कॉंग्रेस, मराठवाड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कोकणात शेकाप, नागपूरमध्ये शिवसेना अशा जागा महाविकास आघाडीने वाटून घेतल्या आहेत. महाविकास आघाडी पाचही जागा निवडून येईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच, नागपूरची जागा शिवसेनेला दिली असली तरीही यासाठी कॉंग्रेसही मदत करणार आहे. या जागांसाठी लवकरच उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे.
अमरावतीमध्ये तिहेरी लढत होणार आहे. भाजपाने उमेदवार जाहीर केलेला असतानाच प्रहार जनशक्तीनेही आव्हान दिले आहे. तर कॉंग्रेसने या मतदारसंघातून धिरज लिंगाडे यांना उमेदवारी दिली आहे. येथे कॉंग्रेसने नुटा आणि विज्युक्टासारख्या संघटनांचे बळ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे भाजपाची मते विभागली जाऊन महाविकास आघाडीला बळ मिळण्याची शक्यता आहे.
भाजप-शिंदे गटात धुसफूस
या निवडणूकांवरून भाजप आणि शिंदे गटात मतभेद असल्याचे दिसून येत आहे. विधान परिषदेच्या उमेदवारीनंतर आता ही धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी आम्हाला विचारात न घेता परस्पर उमेदवार जाहीर केल्याचा शिंदे गटाने आरोप केला आहे. त्यामुळे दोघांमध्ये सर्व काही आलबेल सुरू असल्याचे बोलले जात आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांपैकी तीन जागांवरचे उमेदवार जाहीर केले. परंतु शिंदे गटाला विचारात न घेताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उमेदवारांची नाव जाहीर केल्याने शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली आहे.