- भोसरी पोलिसांची कामगिरी
- 26 लाख 33 हजारांचा ऐवज जप्त
पिंपरी – भोसरीतील एसबीआय बॅंकेचे एटीएम 10 जून रोजी गॅस कटरने कापून 22 लाख 95 हजार 600 रुपयांची रोकड पळवून नेली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी हरियाणात जाऊन ही कारवाई केली आहे. अकरम दीनमोहम्मद खान (वय 23), शौकीन अक्तर खान (वय 24) अरसद आसमोहम्मद खान उर्फ सोहेब अख्तर (वय 46, तिघेही रा. हरियाणा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे आणखी तीन साथीदार फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अरविंद विद्याधर भिडे (वय 58, रा. सहकार नगर, पुणे) यांनी याबाबत शुक्रवारी (दि. 11) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पांजरपोळ, भोसरी येथे एसबीआय बॅंकेचे एटीएम आहे. 9 जून रोजी रात्री साडेदहा ते 10 जून रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून 22 लाख 95 हजार 600 रुपये रोख रक्कम होती.
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी अशा प्रकारच्या चोऱ्या हरियाणा व राजस्थान भागातील लोक करतात, असा अंदाज बांधला. त्यानुसार संबंधित परिसरातील नागरिक, वाहने घटनास्थळी व परिसरात आली आहेत का याची माहिती काढली. पोलिसांचा संशय खरा ठरला. संशयित ट्रक भोसरीमधून हरियाणा येथे जात असताना मोशी टोलनाक्यावर अडवून ताब्यात घेतला. ट्रक चालक अकरम दीनमोहम्मद खान याच्याकडे तपास केला असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या घटनेत त्याच्या वाट्याला आलेले तीन लाख 74 हजार 500 रुपये आणि ऑक्सिजन सिलेंडर जप्त केला.
आरोपी खान याने त्याच्या साथीदारांची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार भोसरी पोलिसांनी थेट हरियाणा गाठले. तेथून दोघांना अटक केली. त्यांचे आणखी तीन साथीदार फरार आहेत. 5 जून रोजी ही टोळी हरियाणा येथून चोरी करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवडेकडे निघाली. रस्त्यात मंचर येथे हॉस्पिटलसमोर पार्क केलेल्या रुग्णवाहिकेतून 6 जून रोजी ऑक्सिजन सिलेंडर चोरला. याबाबत मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दोन दिवस या टोळीने भोसरी परिसरातील एटीएमची पाहणी केली. त्यात त्यांना पांजरपोळ येथील एटीएममध्ये सुरक्षा रक्षक, अलार्म अशा बाबींचा अभाव व निर्मनुष्य परिसर दिसून आला. त्यामुळे हेच एटीएम फोडण्याचे त्यांनी निश्चित केले. अटक केलेल्या आरोपींकडून चोरलेल्या रकमेपैकी 6 लाख 24 हजार 500 रुपये रोकड आणि गुन्ह्यातील इतर साहित्य असा एकूण 26 लाख 33 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.