- करोना रोखण्यासाठी ग्रामपंचायतीचा निर्णय
लोणावळा – लोणावळा शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर अत्यंत दुर्गम भागात असलेल्या मात्र पर्यटकांचे एक आकर्षण स्थळ असलेल्या राजमाची किल्ला आणि परिसर पर्यटकांसाठी लॉक ठेवण्यात आला आहे. येथे पर्यटनास आल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय स्थानिक ग्रामपंचायतीने घेतला आहे.
करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने शासनाने लॉकडाऊनचे अनेक नियम शिथिल केले आहेत. असे असले तरीही हा प्रादुर्भाव पसरणे पूर्णपणे थांबलेले नाही. मात्र याकडे पूर्णतः डोळेझाक करून अनेकजण पर्यटनाच्या नावाखाली नियमांची पायमल्ली करत लोणावळा शहर तसेच आजूबाजूच्या गड किल्ला आणि लेणी परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहे. आणि यामुळे या पर्यटकांच्या सोबतच स्थानिक नागरिकांमध्ये करोना पसरण्याची दाट शक्यता पुन्हा निर्माण झाली आहे.
राजमाची हा किल्ला डोंगर दऱ्या आणि जंगलाने वेढलेला असल्याने याठिकाणी विपुल प्रमाणावर निसर्ग सौंदर्य बघता येते. मात्र, या सौंदर्याचा आनंद घेण्यापेक्षा येथे येऊन सोशल डिस्टनसिंग किंवा मास्कचा वापर करण्यासंदर्भात कोणतेही नियम न पाळता हुल्लडबाजी करणाऱ्यांची तसेच दारू, धिंगाणा घालणाऱ्यांची संख्या वाढल्याचे मागील आठवड्यात बघायला मिळाले. यावर उपाय म्हणून आणि स्थानिक ग्रामस्थांना करोना महामारीपासून दूर ठेवण्यासाठी राजमाची ग्रामस्थांनी पर्यटन बंदीचा निर्णय घेतला आहे.