पिंपरी (तुषार रंधवे ) – मॉडिफाइड सायलन्सरचा कर्कश आवाज करणाऱ्या’ वाहन चालकांनो सावधान! दंड भरावाच लागेल तसेच सायलेन्सर सुध्दा काढावे लागतील. नागरिकांनीसुध्दा अशा वाहन मालकांबद्दल आम्हाला ठिकाणासह कळवा. आम्हीं त्यांच्यावर कडक कारवाई करू, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ट्वीटर अकाउंटवरून करण्यात आले आहे. या आवाहनाला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी आपल्या भागातील बुलेटबरोबरच अन्य वाहनांच्या कर्कश आवाज़ाबाबत तक्रारी केल्या आहेत. तसेच पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिकांने अभिनंदनही केले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने केलेल्या आवाहनानंतर अनेकांनी याबाबतची तक्रार कुठे आणि कशी करायची याबाबतची विचारणा केली होती. त्यावर ज्याठिकाणी दुचाकीस्वारांचा असा उपद्रव मोठ्या प्रमाणात आहे, अशी ठिकाणे तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डीएम करून कळवू शकता. आमची टीम तात्काळ कारवाई करेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी करत विविध सूचनादेखील केल्या आहेत. काही मुख्य रस्त्यावर माइक अथवा आवाज रेकॉर्डर असले पाहिजे. फॅन्सी, चुकीच्या आकारातील, नंबर दिसणार नाही इतक्या छोट्या आकारातील नंबर प्लेट्स हा अजून एक सर्रास दिसणारी गोष्ट आहे. सीसीटीव्हीमधून सुद्धा दिसणार नाही.रस्त्यावरूनच कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. तसेच रिक्षावाल्यांचे साइलेंसर चेक करावे सायलेन्सरच्या आतील कांडी वारंवार बदली करावी लागते. म्हणून ते काढून ठेवतात, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना नागरिकांनी केल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाच्या ट्विटर अकाऊंटवर प्राप्त होणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात आहे. त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दलची माहिती या अकाऊंटवरुन दिल्यास कारवाई केली जाईल.
– स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त,
शहराच्या या भागातून अधिक तक्रारी
भोसरी, सांगवी, संत तुकारामनगर, पिंपरी, वाल्हेकरवाडी व परिसर, तळवडे, रुपीनगर, आकुर्डी रेल्वेस्टेशन, झिरो बॉइज चौक, सुदर्शन चौक, हिंजवडी हिंजवडी रोडमधील बोगदा, शहरातील सर्वच शाळा, महाविद्यालयांचा परिसर.
रात्रीदेखील कारवाईची मागणी
कर्कश सायलेन्सवर पोलिसांकडून रात्री आठ जास्तीतजास्त नऊ वाजेपर्यंत कारवाई केली जाते. मात्र या कालावधीनंतरही अनेक जण नागरीवस्ती व रहिवासी भागात कर्कश आवाजाची वाहने बिनदिक्कतपणे चालवून त्रास देतात. त्यामुळे रात्रीदेखील अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. याशिवाय फॅन्सी नंबर प्लेट, काळी काच, कर्कश हॉर्न व सायलेन्सर, तीव्र प्रकाशझोत अशा विविध बाबींवरदेखील कारवाईची मागणी केली आहे.