पुणे – करोना काळात काही जण भाजीपाला व अन्य कारणे सांगत ठिकठिकाणी गर्दी करत आहेत. अशावेळी सोशल डिस्टन्सिंग नियमाचे उल्लंघन होतच आहे. तसेच काहीजण मास्कही वापरत नाहीत. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करणे योग्यच आहे.
मात्र, खासगी चारचाकी वाहनातून कुटुंबासह मास्क वापरणाऱ्या नागरिकांचा मास्क थोडासा नाकाखाली आला, तरी कारवाई करणे हे कधीही अन्यायकारकच आहे. पोलीस अशा प्रकारची कारवाई चौकाचौकांत करताना दिसत आहेत. अशाच कारवाईचा फटका शहरातील एका ज्येष्ठ दाम्पत्याला बसला आहे.
सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत. मध्यंतरी हॉटेल्स सुरू असताना तेथेही मास्क न वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात होती. लॉकडाऊन 15 मेपर्यंत आहे. अत्यावश्यक सेवा व सवलत दिलेल्या आस्थापनांतील व्यक्तींना कामावर जाण्यास परवानगी आहे. यामुळे लॉकडाऊन असूनही वर्दळ दिसते.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही शहरात ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावून कारवाई सुरू केली आहे. मात्र, यामध्ये अनेकदा पोलीस “टार्गेटेड’ कारवाई करत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
दरम्यान, संपूर्ण सुरक्षा बाळगूनही चारचाकीतून जाताना मास्क थोडा जरी नाकाखाली आला, तरी पोलीस दंडात्मक कारवाई करत आहेत. तर, दुसरीकडे गल्ली-बोळांत विनामास्क, दुचाकीवर ट्रिपल सीट फिरणाऱ्यांकडे मात्र कानाडोळा होत आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात लक्ष देण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.
माझी आई 87 वर्षाची असून ती बिबवेवाडी येथे राहते. तिची विचारपूस करण्यासाठी मला नेहमी जावे लागते. मी पतीसह कारमधून बिबवेवाडीला जात होते. रत्ना हॉस्पिटलपाशी आमची कार अडवण्यात आली. तेव्हा माझ्या तोंडावर मास्क होता, मात्र तो थोडा नाकाखाली आला होता.
मास्क खाली सरकल्याने 500 रुपये दंड भरावा लागेल, असे पोलिसांनी सांगितले. आम्ही पती-पत्नी ज्येष्ठ नागरिक असून स्वत:च्या खासगी कारमधून जात आहोत. यामुळे दंड आकारण्याची गरज नसल्याचे आम्ही सांगितले. मात्र, पोलिसांनी काहीही ऐकून न घेता 500 रुपये दंड आकारला.
– नीलिमा लोकरे, मॉडेल कॉलनी, पुणे