तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – भर चौकातील सावली देणारी अनेक झाडे अज्ञाताने कापल्यामुळे भर उन्हाळ्यात तळेगावातील हरितछत्र धोक्यात आले आहे. याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकाकडून होत आहे.
माझी वसुंधरा अंतर्गत स्वच्छ तळेगाव ,सुंदर तळेगाव, हरित तळेगाव, पर्यावरण पूरक तळेगाव आदींसाठी नागरिकांकडून शपथ घेतली जाते. परंतु तळेगाव दाभाडे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नगरपरिषदेच्या भिंतीला लागून असलेल्या मारुती मंदिर चौकात रिक्षा स्टॅन्डच्या सदस्यांनी बस थांबा नसल्यामुळे प्रवाश्यांना सावली मिळावी,
निवारा मिळावा या हेतूने सुमारे आठ-दहा झाडे काही वर्षांपूर्वी लावली. त्यांची निगा राखून खत–पाणी घालुन वाढवली. त्यातील पूर्ण वाढ झालेली अनेक झाडे रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी कापून टाकली आहेत.
तळेगाव दाभाडे प्रशासकिय इमारतीच्या भिंती शेजारच्या या झाडांची नक्की कुणाला अडचण होती याचा मागोवा प्रशासनाने घ्यावा. तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून होत आहे.