पुणे – रेल्वे स्टेशन येथील वेटींग रुममधून मोबाईल चोरणाऱ्यास पाच महिने तीस दिवस सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली. लोहमार्ग न्यायालय येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.एम. राऊत यांनी हा आदेश दिला. रेल्वे पोलिसांनी मोबाइल ट्रेसिंगद्वारे हा गुन्हा उघडकीस आणला.
अमोल महादेव सोनकांबळे (वय 25, रा. आचेगाव, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत शिवा बानूबू यांनी फिर्याद दिली आहे. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस कॉन्स्टेबल जी.ए.शिंदे, पोलीस नाईक के.बी.गुरव आणि हेड कॉन्स्टेबल बी.ओ. बामनालीकर यांनी मदत केली.
22 फेब्रुवारी 2019 रोजी ते वडिलांना घेण्यासाठी रेल्वे स्टेशनला गेले होते. त्यावेळी वेटींग रुममध्ये मोबाईल चार्जिंग लावून बसले होते. रात्री दीडच्या सुमारास त्यांचा मोबाईल चोरीला गेला. त्यांनी याबाबत लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली. चोरीला गेलेला मोबाईल ट्रेसिंगला लावण्यात आला. तो एका व्यक्तीकडे आढळून आला. त्याला लोहमार्ग पोलीस स्टेशन येथे हजर राहण्यास सांगितले.
त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला. त्याने रेल्वे स्टेशन येथून अनोळखी व्यक्तीकडून मोबाईल विकत घेतल्याचे सांगितले. त्यावेळी त्याला रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे फोटो दाखविले. त्याने सोनकांबळे याला ओळखले. त्यानुसार सरकारी पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने शिक्षा सुनावली. आरोपीला करोनाच्या परिस्थितीमुळे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे निकाल सांगण्यात आला.