आनंदी वृद्धत्व

आपल्या “पंचतंत्र’मध्ये एक मार्मिक बोधकथा सांगितली आहे. सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर ब्रह्मदेव सर्व प्राण्यांना एकत्र बोलावतो. त्यांच्या भवितव्याविषयी त्यांना एकूण कल्पना देतो आणि त्यांना सांगतो की, प्रत्येकाला त्याने पंचवीस वर्षांचे आयुर्मान दिलेले आहे. हे ऐकल्यावर बैल म्हणतो, “पंचवीस वर्षं काय करायचीत मला? पंधरा वर्षांचं आयुष्य पुरे.’ मग माकड म्हणते, “मला दहा वर्षं चालतील. पंचवीस वर्षं फार होतात.’ त्यानंतर घुबड म्हणते, “मलासुद्धा पंधरा वर्षं खूप झाली. पंधरा वर्षांचं आयुष्य मला पुरे होईल.’ हे ऐकल्यावर ब्रह्मदेव त्यांना म्हणतो, “पण मी तर आता तुम्हाला प्रत्येकी पंचवीस वर्षं दिली आहेत. मात्र त्यापेक्षा तुम्हाला जर तुमचं आयुष्य कमी हवं असेल तर ते तुमच्यापैकी एखाद्या प्राण्यानं ही वर्षं त्याच्याकडे घ्यायला हवीत.’ हे ऐकल्यावर मानवप्राणी पुढं येतो. म्हणतो, “या तिघांच्याही आयुष्याची वर्षं मी घ्यायला तयार आहे. मला खूप जगायचंय.’ ब्रह्मदेव मानवाला तेवढी वर्षं देऊन टाकतो. माणसाचं आयुर्मान वाढलं. त्यामुळं झालं असं की, माणसाची पंधरा वर्षं माकडचेष्टा करण्यात जातात. दहा वर्षं तो बैलासारखा ढोरमेहनत करतो. आयुष्याच्या शेवटी घुबडासारखा रात्ररात्र जागत बसतो. माणसासारखा तो फक्‍त पंचवीस वर्षं जगतो. …अशी ही कथा!

एकंदरीत सर्वच बाबतीत माणूस हावरटपणा करतो. तो जसजसा वृद्ध होऊ लागतो, तसतसा चिंताग्रस्त होऊ लागतो. खरं तर वृद्धत्व ही आयुष्यात न चुकणारी पायरी आहे. आजकाल त्यावर बरीच चर्चा चाललेली असते. मला असं वाटतं की, वृद्धत्वावर चर्चा होण्यापेक्षा त्यातून उद्भवणाऱ्या व्याधींवर गरज पडल्यास चर्चा व्हावी… तीही त्यावर मार्ग काढण्याच्या दृष्टीने. दिवसेंदिवस माणसाचं आयुर्मान वाढतच चाललं आहे. साहजिकच वयोमानानुसार काही व्याधी जडतात. काही आजार अनुवंशिक असल्यानं त्यांचेही दुष्परिणाम भोगावे लागतात. मात्र या सगळ्याकडे आपल्याला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहता यायला हवं. एखादा असाध्य रोग झाला तर “हे माझ्याच वाट्याला का?’ असा विचार आपण का करतो? दुसऱ्याला झालेली व्याधी, दुःखं पाहून मात्र आपण असं नाही म्हणत की, “मीच कशी सुटले यातून? त्याच्याच वाट्याला कसं आलं हे?’ जेव्हा एखादी व्याधी जडल्याचं लक्षात येतं, तेव्हा आपण असा विचार करायला हवा की, परमेश्वरकृपेनं आजपर्यंतची इतकी वर्षं तरी मला सुखानं घालवता आली.

वृद्धत्वाकडे पाहण्याची आपली मानसिकताच महत्त्वाची आहे. वृद्धत्वामध्ये शारीरिक व्याधींपासून जशी सुटका नाही; तशीच गतआठवणींपासूनही सुटका नाही. वयोमानानुसार होणाऱ्या बदलांकडे आपण कसं पाहायचं हे मात्र आपल्या हातात आहे. म्हणजे वयानुसार विस्मरण होतं. आपण असं समजायला काय हरकत आहे की, आठवणींच्या ओझ्यातून आपली मुक्‍तता होते आहे, हे किती बरंय! आणखीही काही व्याधींकडे आपल्याला असं पाहता येईल… वय वाढल्यावर आपल्यामागे गुडघेदुखी लागते; आपोआप आपल्या हालचाली झटपट होण्याऐवजी सावकाश होतात. हृदयाला झेपेल एवढाच आपला चालण्याचा, कामाचा वेग राहतो. गुडघ्याच्या निमित्तानं हृदयाला विश्रांती दिली जाते, हे चांगलंच आहे ना! मोतीबिंदू झाला, मानसिक थकवा आला, असं जेव्हा होतं; तेव्हा याचा अर्थ जास्त वाचन, जास्त विचार मेंदूला झेपणार नाहीत. म्हणून मग ही संरक्षक योजना!

पुरातन काळात वानप्रस्थाश्रम होता. आपला उपयोग संपला, नवीन काळाची आव्हानं पेलण्यासाठी नवीन पिढी तयार झाली, आता आपलं काय काम? संसारापासून दूर वनात जावं, असा विचार घरातील वडीलधारी मंडळी करीत असत. या पद्धतीनं आजकाल वृद्धाश्रमात जाता येतं. पण अनेकदा शरीरानं आपण वृद्धाश्रमात असलो तरी मनानं आपण विरक्‍त झालेलो असतो का? महाभारताचं युद्ध संपल्यावर धृतराष्ट्र-गांधारी-विदुर-कुंती हे सर्वजण आपसातलं वैर विसरून सगळ्या जीवनसंघर्षापासून दूर जातात. अशा वेळी सर्वजण सारखेच होतात. एकाच पातळीवर येतात. त्यांच्याप्रमाणे आपल्या मनातले सर्व विकल्प, वृद्धाश्रमात जाताना विसर्जित करू शकतो का आपण?

वृद्धाश्रमाच्या बाबतीत काही वेळा तरुण मुलं असं म्हणतात की, अमेरिकेत नाही का आईवडील वृद्धाश्रमात जात? एकटे राहत? पण त्या वेळी ते हे विसरतात की, वयाची अठरा वर्षे पूर्ण होताच आईबाप मुलांना पैसा व घराची छाया देणं थांबवतात. मुलांच्या शिक्षणाचा पुढचा खर्च ते नाहीत करत बसत. अर्थातच पालकांचे ते पैसे वाचतात, वाढतात. वृद्धपणी कामाला येतात. पाश्‍चात्य देशांमध्ये वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यावर ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी सरकार घेतं. तेथील वृद्धांना सोशल सिक्‍युरिटी आहे. आपल्याकडं असं होत नाही. वृद्धत्व म्हणजे मृत्यूकडे होणारी वाटचाल. मृत्यूची भीती वाटणं स्वाभाविक आहे. मात्र त्यापासून सुटका नाही हे लक्षात घ्यायला हवं. परिपूर्ण आयुष्य उपभोगल्यावर तरी शांतपणे मृत्यूला सामोरं जाता यायला हवं. आणि त्यापूर्वीची वृद्धत्वाची पायरीही आनंदाने ओलांडता यायला हवी.

माधुरी तळवलकर

Leave A Reply

Your email address will not be published.