परीक्षांच्या कामात हलगर्जीपणा प्राध्यापकांना भोवणार

उत्तरपत्रिका तपासणीस टाळाटाळ : पुणे विद्यापीठ प्रशासन कारवाईच्या तयारीत

पुणे  – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पहिल्या सत्रातील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांची उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रिया नुकतीच सुरू झाली. परंतु काही प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणीस टाळाटाळ करत असल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर परीक्षेच्या कामास टाळाटाळ करणाऱ्या प्राध्यापकांवर नियमानुसार कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने स्पष्ट केले.

विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांची पहिल्या सत्रातील परीक्षा दिवाळीपूर्वी आणि त्यानंतर झाली. त्यानंतर सर्व उत्तरपत्रिका कॅप (केंद्रीय मूल्यमापन केंद्र) तपासणीसाठी एकत्रित करण्यात येत आहे. त्यानुसार उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया “कॅप’ येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू झाली आहे. त्याप्रमाणे प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासणी करणे आवश्‍यक आहे.

दरम्यान, ऐनवेळी काही प्राध्यापक वैयक्‍तिक कारण पुढे करून परीक्षेचे काम करण्यास नकार देत असल्याचे दिसून येत आहे. योग्य कारण असेल तर अशा प्राध्यापकांना परीक्षेच्या कामातून सवलत दिली जाते. परंतु काही कारण नसताना परीक्षेचे काम न करणे ही योग्य नाही. त्यावेळी विद्यापीठांना पर्यायी व्यवस्था करावी लागते. परंतु त्याचा परिणाम निकालावर होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

राज्य शासनाने नवीन विद्यापीठ कायदा लागू केला आहे. त्यात सर्व प्राध्यापकांना परीक्षेचे काम करणे अनिवार्य आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई होणे अटळ आहे, अशी तरतूद केली आहे. त्यानंतरही परीक्षेच्या कामास नकार देणाऱ्या प्राध्यापकांचे प्रमाण आजही आहे. त्यातच विद्यापीठ कायद्यानुसार विविध अभ्यासक्रमांचे निकाल किमान 30 ते कमाल 45 दिवसांच्या आत लावणे विद्यापीठांना बंधनकारक आहे. त्यामुळे कसल्याही परिस्थितीत निकालास विलंब होऊ नये, यासाठी परीक्षेचे काम वेळेत होणे हे विद्यापीठापुढे आव्हान आहे.

नवीन विद्यापीठ कायद्यानुसार प्राध्यापकांना परीक्षेचे काम करणे अनिवार्य आहे. उत्तरपत्रिका तपासणीचे कामास ऐनवेळी नकार देणारे जे प्राध्यापक आहेत, त्यांच्याकडून लेखी खुलासा मागविण्यात येईल. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केले जातील.
डॉ. अरविंद शाळिग्राम, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

Leave A Reply

Your email address will not be published.