मूळ उद्देशालाच हरताळ : सोशल डिस्टंन्सिगचा उडतोय फज्जा पिंपरी -“करोना’चा संसर्ग टाळता यावा म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, बाहेर गर्दी होऊ नये यासाठी अनेक कडक नियम करण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केल्यानंतर आता 27 तारखेपर्यंत सकाळी 10 ते दुपारी 2 अशी वेळ किराणा व जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी निश्चित केली आहे. काही सील न केलेल्या भागांमध्ये स्थानिक पातळीवर याहूनही वेळ कमी करण्यात येत आहे. पर्यायाने वेळेच्या बंधनामुळे किराणा दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. वेळ संपायच्या आत सामान घेण्याच्या घाईत नागरिक सोशल डिस्टसिंगचाही फज्जा उडवत आहेत. वाढत्या गर्दीमुळे शहरातील दुकानदार देखील चिंतित आहेत. शहरातील सील केलेल्या काही भागांमध्ये किराणा मालाच्या गाड्यांनाही पोलीस प्रतिबंध करीत असल्याने तेथे माल पोहचवणार कसा? असा प्रश्न घाऊक किराणा दुकानदारांना भेडसावतो आहे. दुकानदारांना माल उतरवून घेण्यासाठी वेळ वाढविला पाहिजे, अशी मागणी करण्यात येत आहे. दूध, किराणा साहित्य, भाजीपाला, फळे आदी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दिवसातून चारच तास वेळ ठेवला आहे. त्यामुळे नागरिकांची सध्या चांगलीच दमछाक होत आहे. सकाळी चारच तास दुकाने उघडायची असल्याने किराणा दुकानदारांनाही चांगलीच कसरत करावी लागत आहे. घाऊक विक्रेत्यांकडून येणारा माल उतरविण्यासाठीही त्यांना वेळ पुरत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. सील केलेल्या भागात नागरिकांची गैरसोय सील केलेल्या परिसरातील नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. घराबाहेर पडता येत नसल्याने नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळविताना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. निगडी-यमुनानगर, भोसरी, थेरगाव-पडवळनगर, खराळवाडी, दापोडी, घरकुल-चिखली, दिघी, संभाजीनगर, पिंपळे गुरव, नेहरुनगर आदींसह विविध भागांमध्ये करोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. ज्या भागांमध्ये करोनाचे रुग्ण सापडले तेथील परिसर सील करण्यात आला आहे. अशा सील केलेल्या परिसरांमध्ये किराणा मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांना देखील पोलीस आत सोडत नाही. छोट्या किराणा दुकानदारांकडे पुरेसे भांडवल नसल्याने ते दोन ते तीन दिवसांनी पैसे जमल्यानंतर माल भरतात. त्यांना मालाचा साठा करून ठेवता येत नाही. त्यातच, किराणा साहित्याची ने-आण करणाऱ्या वाहनांना सील केलेल्या भागात प्रतिबंध केला जात असल्याने त्यांच्याकडे घाऊक दुकानदारांकडून माल पोहचण्यात अडथळे येत आहेत. पर्यायाने, अशा भागामध्ये किराणा साहित्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण होत आहे. किराणा मालाची ने-आण करणाऱ्या गाड्यांना शहरात सील केलेल्या भागामध्ये पोलिसांकडून प्रवेश नाकारला जात आहे. पिंपरी पोलिसांकडून आम्हाला पास देखील उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. त्याशिवाय, घाऊक किराणा दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील पोलिसांकडून ये-जा करण्यास मज्जाव केला जातो. अशी परिस्थिती राहिली तर आम्ही दुकान कसे चालवणार? – श्याम मेघराज, अध्यक्ष, पिंपरी किराणा असोसिएशन.