खेड तालुक्यात 100 रुपयांच्या किटचे वाटप पूर्ण – तहसीलदार डॉ. वाघमारे
राजगुरूनगर : खेड तालुक्यात राज्य शासनाने दीपावली सणाला जाहीर करण्यात आलेल्या “आनंदाचा शिधा’ या योजनेतून 55 हजार 800 रेशनकार्ड धारकांना तेल, रवा, साखर आणि डाळ अशा चार वस्तूंचे 100 रुपयांच्या किटचे वाटप पुर्ण करण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, नायब तहसीलदार संजय शिंदे यांनी दिली.
दिवाळी हा आनंदाचा सण, त्यातच खरीप हंगामातील पिकांना वरुणराजाचे झटके आणि फटके बसल्याने बळीराजाची यंदाची दिवाळी कडू झाली. अवकाळी पावसाचे संकट लक्षात घेता राज्य शासनाने रेशनकार्ड धारकांना 100 रुपयांत चार वस्तूरुपात अन्नधान्य तेल पुरवण्याचा निर्णय घेतला. दिवाळीचे बिगुल वाजू लागले फटाके फुटु लागले तरी “आनंदाचा शिधा’ कार्डधारकांना पोहचवण्यात अडचणी येऊ लागल्या.
तालुक्यात पहिल्या टप्यात 20 हजार दिवाळी किट आले. त्याचे वितरण करण्यात आले; मात्र ई-पॉंज मशीनचे इंटरनेट गायब झाल्याने व झाल्याने व सर्व्हर डाऊनमुळे रेशनिंग दुकानात किट येऊनही वाटप करता येत नसल्याने सर्वत्र रेशनकार्ड धारकांची ओरड झाली. अखेर यावर ऑफलाइन पद्धतीने शिधा वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.
खेड सरकारी धान्य गोडाऊनमध्ये प्राप्त धान्य किट जास्त अतंर असलेल्या पश्चिम भागात वेळेचा विचार करुन अगोदर पोहचविण्यात आले. जवळच्या परिसरातील रेशनिंग दुकानांना टप्यटप्याने वितरण करुन 100 टक्के वाटप करण्यात आले.
– संजय शिंदे, महसूल नायब तहसीलदार