फलटण – फलटण येथे उद्यापासून सुरू होणाऱ्या (दि. 29 ऑक्टोबर) राष्ट्रीय किशोर- किशोरी खो खो स्पर्धेसाठी फलटण नगरी सज्ज झाली असून त्यासाठी असणारी आवश्यक सर्व तयारी महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. ही स्पर्धा दि. 2 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
फलटण येथे या स्पर्धेसाठी एकूण 47 संघ भाग घेणार आहेत. त्यामधील 24 संघ किशोर म्हणजेच मुलांचे आहेत तर 23 संघ किशोरी म्हणजेच मुलींचे आहेत. माजी आमदार श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर क्रीडां संकुलातील मैदानावर या स्पर्धेतील सामने होणार आहेत. या क्रीडांगणावर प्रेक्षकांसाठी दहा हजार आसन क्षमता असलेली प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आलेली आहे. यामध्ये पत्रकारांसाठी प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया असे कक्ष तयार करण्यात आलेले आहेत. यासोबतच गुणलेखक कक्ष व पदाधिकारी कक्षसुद्धा क्रीडांगणावर उभारण्यात आले आहेत.
येथे उभारण्यात आलेल्या गॅलरींना माजी नगराध्यक्ष कै. अशोकराव देशमुख गॅलरी, कै. किरण विचारे गॅलरी, कै. विजयकुमार खलाटे गॅलरी, माजी नगरसेवक कै. जगन्नाथ कुंभार गॅलरी अशी नावे देण्यात आली आहेत. प्रवेशद्वारास कै. पी. जी. शिंदे यांचे नाव देण्यात आले आहे. क्रीडांगणावर उभारण्यात आलेल्या चार मैदानांवर सर्व सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यामधील तीन मैदाने ही मातींची असून एक मॅटचे मैदान तयार करण्यात आलेले आहे. सकाळच्या सत्रात 20 सामने तर सायंकाळच्या सत्रामध्ये एकूण 15 सामने खेळवले जाणार आहेत.
सायंकाळच्या सत्रातील सर्व सामने प्रकाशझोतात खेळविण्यात येणार आहेत. सामन्यांमध्ये खेळताना एकूण आठ गट असणार आहेत. त्या आठ गटातून दोन उपविजेते व दोन विजेते अशा दोन गटांमध्ये बाद फेरीमध्ये जाणार आहेत. त्यानंतर उपांत्यपूर्व सामना, उपांत्य सामन्या व अंतिम सामना अशा पद्धतीने सामने होणार आहेत.
सकाळच्या सत्रामध्ये उपांत्य सामने खेळवले जाणार आहेत. त्यामध्ये किशोरी म्हणजे मुलांचे तर किशोरी म्हणजे मुलींचे सामने होणार आहेत. त्यानंतर तृतीय क्रमांकासाठी सकाळच्या सत्रामध्ये सामना होणार आहे. किशोर व किशोरी यांचा अंतिम सामना सायंकाळी मॅटवरील मैदानावर होणार आहे.