मुंबई : तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी अतिशय घातक असून यामुळे संपूर्ण जीवनाचा नाश होतो. यासह कुटुंबसुद्धा उध्वस्त होते. सुदृढ आरोग्य लाभावे यासाठी व्यसनांपासून दूर राहा व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संदेशाद्वारे केले.
सुदृढ आयुष्य आपल्या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी महत्त्वाचे आहे. या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त संकल्प करुन व्यसनाला हद्दपार करुन सुंदर आयुष्य सुनिश्चित करुया, असेही आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
आरोग्य विभाग, सलाम मुंबई संस्था, राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, नशाबंदी महामंडळ, बेस्ट परिवहन यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रागण येथे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या वेळी आरोग्यमंत्र्यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले.
जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी 31 मे रोजी जगभर साजरा केला जातो. तंबाखूमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि तंबाखू नियंत्रण कायद्याविषयी जनजागृती निर्माण करणे हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी “तंबाखूमुळे आपल्या पर्यावरणाला धोका’ अशी या वर्षाची संकल्पना आहे.