पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीत मिळणारा आगाऊ पगार (अग्रीम) यावर्षी मिळालेला नाही. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करावी, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. प्रशासकीय भोंगळ कारभारामुळे पोलिसांची यंदाची दिवाळी निराशेत सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.
शहरातील निम्म्या पोलिसांचे पगार एसबीआय बॅंकेत, तर उर्वरित पोलिसांचे पगार ऍक्सिस बॅंकेत होतात. दरवर्षी दिवाळीच्या आधी पोलिसांना सुमारे साडेबारा हजार रुपये आगाऊ पगार मिळतो. मिळालेला हा अग्रीम त्यानंतर पगारातून टप्प्याटप्प्याने कपात केला जातो. त्यामुळे पोलीस कुटुंबियांची दिवाळी आनंदात साजरी होते. मात्र यंदाच्या वर्षी एसबीआय बॅंकेत खाते असलेल्या पोलिसांना अग्रीम रक्कम मिळाली आहे. तर ऍक्सिस बॅंकेत खाते असणाऱ्यांच्या खात्यावर अद्यापही पैसे जमा झालेले नाहीत.
आता शनिवारपासून सोमवारपर्यंत बॅंकांना सुट्टी लागली आहे. तर मंगळवारी बॅंका उघडणार असल्या तरी दिवाळी संपुष्टात येणार आहे. अशावेळी दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे.
करोनाच्या काळात पोलिसांनी जीव धोक्यात घालून बंदोबस्ताचे काम केले. काही पोलिसांना करोनाची बाधाही झाली. तर तीन पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना सरकारच्या वतीने 60 लाखांचा धनादेश नुकताच देण्यात आला. तसेच त्यांच्या घरी मिठाई देखील पाठविण्यात आली.
मात्र ऍक्सिस बॅंकेत खाते असलेल्या कर्मचाऱ्यांना आगाऊ पगार मिळालेला नाही. घरी गेल्यावर पत्नी दिवाळीच्या साहित्यासाठी यादी देत आहे. तर मुलांचाही खाऊ, फटाके आणि नवीन कपड्यांसाठी आग्रह होत आहे. यासाठी पैसे आणायचे कोठून, असा प्रश्न या पोलिसांसमोर निर्माण झाला आहे.
पोलीस अधिकारीही अनभिज्ञ
ऍक्सिस बॅंकेत खाते असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळीचा अग्रीम मिळालेला नाही. याबाबत काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विचारले असता आम्ही केव्हाच तो देण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र त्यांना अग्रीम का मिळाला नाही, यांची चौकशी करावी लागेल, असे सरकारी उत्तर दिले.