पुणे – सलामीवीर शिखर धवन, कर्णधार विराट कोहली यांच्यानंतर कृणाल पांड्या आणि लोकेश राहुल यांच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 318 धावांचे आव्हान ठेवले आहे. भारतीय संघाने निर्धारित 50 षटकांत 5 बाद 317 धावा केल्या.
इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने टाॅस जिंकून भारतास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होते. त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी संयमी सुरूवात केली. पहिल्या विकेटसाठी त्यांनी 64 धावांची भागिदारी केली. रोहित शर्मा 28(42) धावांवर बाद झाला. त्याला बेन स्टोक्सने बटलरकरवी झेलबाद केलं. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या विराटने धवनसोबत चांगली फलंदाजी करत दुसऱ्या विकेटसाठी 105 धावा जोडल्या. विराट कोहलीला मार्क वूडने मोईनअली करवी झेलबाद केले. विराटने 56(60) धावांची खेळी केली. त्यानंतर फलंदाजीस आलेला श्रेयस अय्यर फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही आणि केवळ 6 धावा करून माघारी परतला. त्याला मार्क वूडने झेलबाद केले. अय्यरनंतर शिखर धवनही लगेचच बाद झाला. शिखर धवनने 106 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकरांच्या मदतीने सर्वाधिक 98 धावांची खेळी केली. त्याला बेन स्टोक्सने माॅर्गनकरवी झेलबाद केलं.त्यांनतर फलंदाजीस आलेला हार्दिक पंड्याही केवळ 1 धाव काढून बाद झाला. त्यालाही बेनस्टोक्सने बेयरस्टोकरवी झेलबाद केले.
पंड्या बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या 5 बाद 205 अशी होती. त्यानंतर लोकेश राहुल आणि कृणाल पंड्या यांनी फटकेबाजी करताना आपापली अर्धशतके पूर्ण करताना संघाची धावसंख्या 50 षटकांत 317 पर्यंत नेली. दोघांनी 112 धावांची भागिदारी केली. लोकेश राहुलने 60 चेंडूत 6 चौकारासह नाबाद 56 तर कृणाल पंड्याने 31 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकरांसह नाबाद 58 धावांची खेळी केली.
दरम्यान, इंग्लंड विरुद्धच्या या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी पदार्पण केलं आहे. कृणाल आणि प्रसिद्ध टीम इंडियाकडून एकदिवसीय पदार्पण करणारे 233 आणि 234 वे खेळाडू ठरले आहेत. कृणाल पंड्याने पदार्पणात शानदार अर्धशतक झळकावलं आहे. अवघ्या 26 चेंडूत कृणालने अर्धशतक पूर्ण केलं.
इंग्लंडकडून गोलंदाजीत बेनस्टोक्सने 8 षटकांत 34 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर मार्क वूडने 10 षटकांत 75 धावा देताना 2 विकेट्स घेतल्या.