लाहोर : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफीज सईद याच्या जिवाला धोका असल्याने त्याच्याविरुद्ध सुरू असलेला खटला लाहोरमधील न्यायालयात वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे. खटला अन्यत्र वर्ग करण्याची मागणी करणारी सईदची याचिका लाहोर उच्च न्यायालयाने मान्य केली. दहशतवादाला आर्थिक साहाय्य केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुजरनवालाच्या दहशतवादविरोधी न्यायालयात त्याच्या विरोधात खटला सुरू होता.
संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी घोषित केलेला सईद 17 जुलै रोजी लाहोर येथून गुजरनवालाकडे जात असताना त्याला दहशतवादाला आर्थिक साहाय्य केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. सईदने केलेल्या याचिकेवर सोमवारी लाहोर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सरदार शमीम अहमद यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारच्या विधि अधिकाऱ्याने सईदच्या मागणीला हरकत न घेतल्याने न्या. अहमद यांनी सईदची मागणी मान्य केली. सईदला लाहोरच्या कोट लखपत कारागृहात ठेवण्यात आले आहे आणि त्याला सुनावणीच्या वेळी गुजरनवाला येथे नेण्यात येते. गुजरनवाला येथे नेताना त्याच्या जिवाला धोका होऊ शकतो, सरकारला त्याच्या सुरक्षेची व्यवस्था करावी लागते, असे सईदचे वकील ए. के. डोगर यांनी न्यायालयास सांगितले. त्यानंतर न्या. शमीम अहमद यांनी सईदचा खटला न्या. मोहम्मद कासीम खान यांच्या अध्यक्षतेखालील दोन सदस्यांच्या पीठाकडे वर्ग केला.