ब्युनोस आयर्स : भारताच्या सुमित नागलने एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळवित कौतुकास्पद कामगिरी केली. त्याने अंतिम फेरीत त्याने स्थानिक खेळाडू फॅकुन्दो बोग्नीसवर 6-4, 6-2 असा सनसनाटी विजय नोंदविला.
हरयाणामधील 22 वर्षीय खेळाडू सुमितने पासिंग शॉट्स, अचूक व बिनतोड सर्व्हिस असा बहारदार खेळ केला. त्याने दोन्ही सेट्समध्ये सर्व्हिसब्रेक मिळविला. बोग्नीसला प्रेक्षकांचा भरघोस पाठिंबा मिळाला मात्र, त्याचे कोणतेही दडपण न घेता सुमितने जोरदार खेळ केला. सुमितने अमेरिकन खुल्या स्पर्धेतील पहिल्या फेरीत रॉजर फेडररविरूद्ध पहिला सेट घेताना आश्चर्याचा धक्का दिला होता. सुमितने येथील विजेतेपदामुळे जागतिक क्रमवारीत 135 व्या स्थानावर झेप घेतली आहे.