मुंगसा मुंगसा तुला रामाची शपथ

माझी एक मावस बहीण आहे. वंदना नाव आहे तिचे. मोठी गोड आहे. म्हणजे बोलायला. त्यामुळे कधी कधी तिला सगळे गोडबोलीच म्हणतात आणि ती आहेही गोडबोलीच. देखल्या देवा दंडवत म्हणतात, तसे भेटली की इतके अगत्य दाखवते, इतके अगत्य दाखवते आणि इतकी भरभरून बोलते की असे वाटते, आपल्या इतके तिच्या जीवाभावाचे कोणीही नाही. मात्र, दृष्टीआड होताच ती एकदम विसरून जाते आपल्याला. मोबाइलमधला डाटा डिलिट करतात ना, तसेच ती आपल्याला पुन्हा भेटेपर्यंत वा तिचे काही काम निघेपर्यंत तिच्या आठवणीतून जणू डिलिट करून टाकते, पण असे असले तरीही गमतीची गोष्ट म्हणजे तिला भेटल्याशिवाय मला चैन पडत नाही आणि भेटायचे तर मलाच तिच्याकडे जावे लागते.

ती राहते सहकारनगर नंबर दोनला. तिला भेटायला तिच्याकडे जायचे तर अर्धा दिवस मोकळा काढून जावे लागते. महिना पंधरा दिवसांनी माझे तिच्याकडे जाणे होतेच. ती मात्र माझ्याकडे आल्याचे फारसे आठवत नाही. माझा मुलगा तर म्हणतो वंदूताई 1857 साली आपल्याकडे आली होती. त्यानंतर काही फिरकली नाही. असो, हा गमतीचा भाग झाला. पण आमचे येणे जाणे हा वन वे ट्रॅफिक आहे, हे नक्की, पण तरीही शेवटी ती आपलीच आहे, त्यामुळे तिच्याकडून फारशा अपेक्षा न करता आपणच भेटायला जायचे हे बरे. कारण शेवटी आपुलकीची वेडी ओढ आपल्यालाच असते.

तिच्याकडे कधीही गेले तरी वाटेत मुंगूस दिसतेच. खरं तर शहरात असले प्राणी सहसा बघायला मिळत नाहीत. पण सहकारनगरमध्ये मात्र अगदी डांबरी रस्त्यावरसुद्धा रस्ता क्रॉस करणारे मुंगूस दिसते. गेल्या रविवारी आम्ही गेलो होतो, तेव्हा सकाळी अकराच्या सुमारास रस्त्यातच मुंगूस दिसले. त्याला बघताच “ओंकार मोठ्याने ओरडला, “मुंगसा मुंगसा तोंड दाखव, तुला रामाची शपथ आहे. आणि खरोखर ते मुंगूस धावता धावता रस्त्याच्या मध्यभागी क्षणभर थांबले. त्याने मान वळवून एकवार आमच्याकडे पाहिले आणि जणू शपथ सुटली असे म्हणत ते तुरू तुरू पळत रस्त्याच्या दुसऱ्या कडेला दिसेनासे झाले. आम्ही सारी बघतच राहिलो त्याच्याकडे. ओंकार खूश झाला.

रामाची शपथ घालताच मुंगूस का थांबते, असा प्रश्‍न त्याने मला अचानक विचारला. त्याला देण्यासाठी माझ्याकडे योग्य उत्तर नव्हते, त्यामुळे मी त्याचा प्रश्‍न ऐकल्या न ऐकल्यासारखे करत वेळ मारून नेली, पण मनात तो उत्तर न सापडणारा प्रश्‍न रेंगाळत राहिला. खरंच रामाची शपथ घातल्यावर मुंगूस थांबतं का? मग मला लहानपणातील आठवण आली.

लहानपणी कोणीही शपथ घातली की ती पाळावी लागायची. शपथ घातल्यावर खोटे बोलणे अशक्‍य व्हायचे. मग ती घातलेली शपथ कधी देवाची असायची, कधी शपथ घालणारा, तुला माझी शपथ आहे, असे गळ्यावर हात ठेवून सांगत स्वत:चीच शपथ घालायचा, कधी विद्येची शपथ असायची आणि सर्वात रामबाण शपथ म्हणजे आईची शपथ. बाकी तुला आईची शपथ आहे असे म्हटले की कोणतेही काम व्हायचेच व्हायचे. कोणी शपथ घातली आणि ती पाळणे शक्‍य नसले तर मग शपथ “सुटली म्हण, सुटली म्हण’ अशी विनवणी करायला लागायची.

“आभाळातून पडली साखळी आणि तुमची शपथ झाली मोकळी’ असा एक मंत्र माझ्या भावाने कोठून तरी शोधून काढला होता, त्यामुळे तो कोणत्याही शपथेला दाद देत नसे. आता मात्र शपथेचे मोल राहिलेले नाही. माणसे एकतर शपथ घेत नाहीत, शपथ घालतही नाहीत. मागे अशोक सराफचा एक चित्रपट आला होता ना, “देवाशपथ खोटे सांगेन…’ तसा सारा प्रकार झाला आहे. शपथेवर खोटे बोलणे अगदी नैसर्गिक झाले आहे. तेव्हा बिचारे मुंगूस अजूनही रामाची घातलेली शपथ पाळते आणि कितीही घाईत आणि कुठेही असले तरी थांबून आपले तोंड दाखवते ही खरोखरच अगदी कौतुकाची गोष्ट आहे.

अश्‍विनी महामुनी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.