मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर अटकेत असलेले गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असतानाच आता सदावर्ते यांच्या अडचणी वाढवणारं आणखी एक वृत्त समोर आलं आहे.
मुंबईत शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या चार एसटी कर्मचाऱ्यांपैकी दोघांनी हल्ल्यासाठी सदावर्तेंकडे बोट दाखवलं आहे. या हल्ल्यामध्ये आपली काही भूमिका नसून सर्व काही सदावर्तेंनी केलं अशी कबुली आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशी यांनी दिली आहे.
आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांनी न्यायाधीशांशी बोलण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी न्यायाधिशांकडे आपल म्हणणं मांडलं. या प्रकरणात आमची काहीही भूमिका नाही. उलट आम्ही आरोपी नसून, सगळं सदावर्ते यांनी केलं असं अभिषेक पाटीलने म्हटलं. तर दुसरा आरोपी चंद्रकांत सुर्यवंशी यांने अशीच कबुली दिली आहे.
एकंदरीतच आरोपींनी दिलेल्या कबुलीमुळे सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर त्यांच्या पत्नी जयश्री पाटील सध्या फरार आहेत.