बंगळुरु -सलामीवीर शुभमन गिलने फटकावलेली शानदार शतकी खेळी व विजय शंकरने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने रविवारी आयपीएल स्पर्धेतील अखेरच्या साखळी लढतीत रॉयल चॅलेंजर बंगळुरुचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यातील पराभवामुळे बंगळुरुचे प्लऑफमध्ये स्थान मिळवण्याचे स्वप्न भंग झाले.
बंगळुरुने विजयासाठी दिलेल्या 198 धावांचा पाठलाग करताना वृद्धिमान साहा व शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात केली मात्र, साहा बाद झाल्यावर त्यांची धावगती मंदावली. मात्र, पिंचहिटर म्हणून आलेल्या विजय शंकरने गिलला सुरेख साथ देत अर्धशतकी खेळी केली. त्याने गिलसह दुसऱ्या गड्यासाठी 123 धावांची भागीदारी केली. गिलनेही शतकाकडे कूच केली होती. विजय शंकर 35 चेंडूत 7 चौकार व 2 षटकारांसह 53 धावांवर परतला. गिलने संघाचे दीडशतक फलकावर लावले. त्याचवेळी आलेला दासुन शनाकाही खाते उघडण्यापूर्वीच परतला. त्यानंतर गिलने गुजरातला सामना एकहाती जिंकून दिला. त्याने थाटात आपले सलग दुसरे शतक साकार केले. त्याने नाबाद 104 धावांच्या खेळीत 52 चेंडूत 5 चौकार व 8 षटकार फटकावले.
तत्पूर्वी, विराट कोहलीच्या विक्रमी शतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बंगळुरुने गुजरात टायटन्सविरुद्ध मर्यादीत 20 षटकांत 5 गडी गमावून 197 अशी समाधानकारक मजल मारली. कोहलीने यंदाच्या स्पर्धेतील सलग दुसरे तर स्पर्धेच्या इतिहासातील सातवे शतक साकार केले. त्याने ख्रिस गेलच्या सहा शतकांचा विक्रम मोडला.
गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत बंगळुरुला पहिल्यांदा फलंदाजी दिली. बंगळुरुचे सलामीवीर कर्णधार फाफ डुप्लेसी व विराट कोहली यांनी धडाक्यात सुरुवात केली. पॉवरप्लेमध्येच त्यांनी अवघ्या 38 चेंडूत 62 धावांची सलामी दिली. डुप्लेसी स्थिरावलेला असतानाच नूर अहमदच्या गोलंदाजीवर 28 धावांवर परतला. कोहलीला साथ देण्यासाठी खेळपट्टीवर ग्लेन मॅक्सवेलपासून अन्य प्रमुख फलंदाजांनी साफ निराशा केली. कोहलीने मात्र, एकाकी लढत देत शतक साकार केले. त्याने रावतसह अर्धशतकी भागीदारी केली. रावतने 14 चेंडूत 1 चौकार व 1 षटकारासह नाबाद 23 धावा केल्या. कोहलीने नाबाद 101 धावांची खेळी करताना 61 चेंडूत 13 चौकार व 1 षटकार फटकावला.
संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर बंगळुरु – 20 षटकांत 5 बाद 197 धावा. (फाफ डुप्लेसी 28, मायकल ब्रेसवेल 26, विराट कोहली नाबाद 101, अनुज रावत नाबाद 23, नूर अहमद 2-39, रशीद खान 1-24). गुजरात टायटन्स – 19.1 षटकांत 4 बाद 198 धावा. (विजय शंकर 53, शुभमन गिल नाबाद 104, राहुल तेवतिया नाबाद 4, महंमद सिराज 2-32).