पुणे – आयपीएल क्रीकेट मॅचवर बेटिंग घेणाऱ्या सट्टेबाजांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. यामध्ये तिघांना अटक करण्यात आली असून ते देशपातळीवरील एका बड्या बुकीसाठी काम करत होते. पुण्यातील त्यांचे नेटवर्क येथील एका पब मालकाच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते. या दोघांनाही आरोपी करण्यातआले आहे.
कोंढव्यातील साईबाबानगर येथील धर्मश्री सिग्नेचर सोसायटीत आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा सुरू असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकत वसिम हनिफ शेख (३९, रा. कोंढवा), इक्रामा मकसुद मुल्ला (२६, रा. घोरपडी पेठ), मुसाबिप महमुद बसाइब (३५, रा. सोमवार पेठ) यांना अटक करण्यात आली त्यांच्यासह जितेश मेहता (रा. पुणे) आणि अक्षय तिवारी (रा. इंदौर) यांच्यावरही कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदभात अंमलदार शंकर संपते यांनी तक्रार दिली आहे आयपीएलमध्ये दिल्ली विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना सुरू होता.
या मॅचवर आरोपी ऑनलाइन पद्धतीने वेगवेगळ्या वेबसाइट आयडीव्दारे मोबाइल व लॅपटॉपचा वापर करून जुगार खेळत होते. त्यांनी याआधी झालेल्या आयपीएलमध्येही जुगार खेळलेला आहे. यातील जितेश मेहता याचा कोरेगाव पार्कमध्ये एक पब आहेत. तर अक्षय तिवारी बडा बुकी असून त्याचे देशपातळीवर नेटवर्क आहे. त्याचे पुण्यातील काम जितेश मेहता सांभाळत होता. आरोपीं परदेशातील कोणतेही नेटवर्क अद्याप उघड झाले नाही. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव करत आहेत.