नवी दिल्ली – सेंच्युरियन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत स्लो ओव्हर रेटसाठी टीम इंडियाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनाकडून( ICC ) दंड ठोठावण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दोन षटके कमी टाकल्याबद्दल रोहित शर्माच्या संघाच्या नेतृत्वाखालील भारताचे जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठीचे ( WTC ) २ गुण देखील कापण्यात आले आहेत. यासह संघाला मॅच फीच्या १० टक्के दंड देखील ठोठावण्यात आला आहे. एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनल ऑफ मॅच रेफ्रीच्या ख्रिस ब्रॉडने भारताने टार्गेटपेक्षा दोन षटके कमी टाकल्यानंतर हा निर्णय दिला आहे. आयसीसीच्या कोड ऑफ कंडक्टच्या कलम २.२२ नुसार टीम इंडियाला हा दंड ठोठावण्यात आला आहे. हे कलम किमान ओव्हररेटशी संबंधित आहे. यामध्ये खेळाडूंना जर ते निर्धारित वेळेत गोलंदाजी करू शकले नाहीत तर प्रत्येक षटकासाठी त्यांच्या मॅच फीच्या ५% दंड आकारला जातो. दरम्यान स्लो ओव्हर रेटसाठी दोन गुण वजा केल्याने डब्लूटीसी पॉइंट टेबलमधील टीम इंडियाची स्थिती कमकुवत झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडिया आता १६ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. त्यात २ गुण कापल्यानंतर १४ गुणांसह भारताची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. पहिल्या कसोटीत दारूण पराभव सेंच्युरियन कसोटीत भारताचा तिसऱ्या दिवशी एक डाव आणि ३२ धावांनी दारूण पराभव झाला आहे. यासह आफ्रिकन भूमिवर पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकूण ऐतिहासिक कामगिरी करण्याची भारताची संधी हुकली होती. भारताचा संघ दुसऱ्या डावात १३१ धावांत सर्वबाद झाला. विराट कोहलीने अर्धशतक केले, मात्र बाकीचे फलंदाज काही विशेष कामगिरी करू शकले नाहीत. दक्षिण आफ्रिकेकडून नांद्रे बर्गरने ४ बळी घेतले होते. बावुमा केपटाऊन कसोटीतूनही आऊट दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा दुखापतीमुळे आता केपटाऊनमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातूनही बाहेर पडला आहे. दुसऱ्या कसोटीत त्याच्या जागी डीन एल्गर संघाचे नेतृत्व करणार आहे. दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांनी याबाबदची पुष्टी केली आहे. सेंच्युरियन कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी २०व्या षटकात लाँग-ऑफमध्ये सीमारेषेपूर्वी चेंडू थांबवताना बावुमाला दुखापत झाली. त्यानंतर तो ताबडतोब मैदानातून निघून गेला आणि त्याला स्कॅनसाठी पाठवण्यात आले, ज्यात त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जेराल्ड कोएत्झीही सामन्याबाहेर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्झी भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. पेल्विक सुजल्याने तो केपटाऊनमधील दुसऱ्या कसोटीत खेळणार नाही. दक्षिण आफ्रिका बोर्डाने शनिवारी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेने अद्याप कोणाचेही नाव घेतलेले नाही. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने सांगितले की, सेंच्युरियनमधील पहिल्या कसोटीदरम्यान कोएत्झीला सूज आली आणि भारताच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना त्याची अस्वस्थता वाढली. शुक्रवारी त्याला स्कॅनसाठी पाठवण्यात आले, त्यावरून दुखापतीचे गांभीर्य स्पष्ट झाले. २३ वर्षीय कोएत्झीने सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत केवळ एक विकेट घेतली होती. कोएत्झीच्या जागी दक्षिण आफ्रिकेकडे लुंगी एनगिडी आणि विआन मुल्डरच्या रूपात वेगवान गोलंदाजीचे पर्याय आहेत.