अहमदाबाद – प्राथमिक शाळांच्या शिक्षकांसंदर्भात गुजरात सरकारने नुकतीच एक अधिसूचना जारी केली. त्या पाऊलाला मोठा विरोध झाल्यानंतर सरकारने माघार घेत बुधवारी ती अधिसूचना रद्द केली.
गुजरातमधील प्राथमिक शिक्षकांच्या कामाच्या वेळेबाबत काही दिवसांपूर्वी अधिसूचना जारी करण्यात आली. त्यानुसार, प्राथमिक शिक्षकांसाठी सोमवार ते शुक्रवार कामाचे 8 तास, तर शनिवारसाठी 5 तास निश्चित करण्यात आले.
अधिसूचना जारी करताना शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्याचा आधार घेण्यात आला. आरटीई कायद्यानुसार प्राथमिक शिक्षकांनी आठवड्यातील 45 तास कार्य करणे गरजेचे असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले.
त्यामुळे प्राथमिक शिक्षकांना अतिरिक्त दोन तास कार्यरत राहावे लागणार होते. शिक्षकांच्या संघटनांनी त्या अधिसूचनेला जोरदार विरोध केला. प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसनेही अधिसूचना मागे घेण्याची मागणी केली.
संबंधित अधिसूचनेवरून वादंग निर्माण झाल्याचे पाहून सरकारने नमते घेतले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ती अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शिक्षक संघटनांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.