अहमदाबाद – गुजरातमधील तरूण नेते हार्दिक पटेल यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न प्रदेश कॉंग्रेसने सुरू केले आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर यांनी हार्दिक यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे.हार्दिक गुजरात कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून ते पक्षाच्या राज्य नेतृत्वाविषयी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत आहेत. हार्दिक यांनी भाजपची प्रशंसा करणारे वक्तव्यही केले.
त्यामुळे ते वेगळा विचार करत आहेत काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर, ठाकोर यांनी हार्दिक यांना चर्चेसाठी बोलावले आहे. चर्चेवेळी गाऱ्हाणी मांडण्याचे आवाहन ठाकोर यांनी केले आहे. त्याला हार्दिक कसा प्रतिसाद देतात याविषयी उत्सुकता आहे. गुजरातमध्ये चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीला ताकदीने सामोरे जाण्याची रणनीती कॉंग्रेस आखत आहे. अशात हार्दिक यांची नाराजी पक्षाची चिंता वाढवणारी ठरली आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जाणार असल्याचे समजते.