लोणीकंद डी. बी. पथकाची कामगिरी ; कटकेवाडी येथील घटना
वाघोली- बाहेरील राज्यातून नवीन कार घेऊन आलेल्या कंटेनरचालकाचा विश्वास संपादन करून कटकेवाडी येथे डिलिव्हरी करताना कंटेनरमधील चारचाकी परस्पर चोरून नेणाऱ्या गाईडला लोणीकंद पोलिसांच्या डी. बी. पथकाने सापळा रचून पकडले. त्याच्याकडून चोरून नेलेली चारचाकी उस्मानाबाद येथून जप्त करण्यात आली आहे. गजानन ऊर्फ गज्या दगडू गवई ऊर्फ काळे (वय 30, रा. चिखली, बुलढाणा), असे नवीन गाडी चोरून नेणाऱ्या गाईडचे नाव आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन काळे हा बाहेरील राज्यातून नवीन गाड्या घेऊन आलेल्या कंटेनरचालकांकडून ठराविक रक्कम घेऊन पत्ता सांगण्यासाठी गाईडचे काम करतो. दीड महिन्यांपूर्वी पुण्यात सहा नवीन कारची डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या एका कंटेनरचालकाला गाईड करीत होता. पुणे – सोलापूर रोडला तीन कारची डिलिव्हरी केल्यानंतर उर्वरित तीन गाड्या कटकेवाडी येथील कोठारी व्हील्स येथे डिलिव्हरी करण्यासाठी आले होते. कंटेनरचालक तीनपैकी दोन कार पोहोच करून येईपर्यंत तिसरी गाडी गजानन काळे याने परस्पर चोरून नेली. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात गाडी चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती.
चोरीचा तपास सुरू झाल्यानंतर डी. बी. पथकाचे बाळासाहेब सकाटे व ऋषिकेश व्यवहारे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक जण कार डिलिव्हरीसाठी येणाऱ्या कंटेनर चालकांना गाईड असल्याचे सांगून दिशाभूल करीत आहे. पथकाने सासवड रोडवरील वडकी येथे ऑटो विस्टा मारुती सुझुकी शोरूमजवळ संशयित गाईड गजानन काळे यास ताब्यात घेतले. लोणीकंद पोलीस ठाणे येथे आणून कसून चौकशी केली असता त्याने कटकेवाडी येथून कार चोरून नेल्याचे कबूल केले. काळे याने कार चोरल्यानंतर उस्मानाबाद येथे ओळखीच्या मित्राकडे लावली होती. परत येतो असे सांगून पुन्हा कार घेण्यासाठी आलाच नाही. उसमानाबाद येथून लोणीकंद पोलिसांनी कार जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे बाळासाहेब सकाटे, समीर पिलाणे, ऋषिकेश व्यवहारे यांनी केली आहे.