“जनता कर्फ्यू’चे तुम्हीच ठरवा; आता लॉकडाऊन नाहीच

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा आमदार जगताप व महापौर वाकळे यांना सल्ला

नगर -केंद्र सरकारने मनाई केलेली असल्याने आता नगरच काय. पण देशात इतर कोठेही लॉकडाऊन केले जाणार नाही. नगरमध्ये गरजच वाटत असेल, तर स्थानिक आमदार व महापौरांनीच जनतेचा विचार घेऊन “जनता कर्फ्यू’चा निर्णय घ्यावा, असा सल्ला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांना आज दिला. मात्र, जनता कर्फ्यू जाहीर केल्यावर आधी दोन दिवस व जनता कर्फ्यू संपल्यावर पुढेचे 3-4 दिवस बाजारात गर्दी उसळते व जनता कर्फ्यूचा काहीच फायदा होत नाही, असा अनुभव असल्याचे स्पष्टीकरणाही त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे करोनासंदर्भातील परिस्थितीचा आढावा पालकमंत्री मुश्रीफ यांनी घेतला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह, आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, अन्न व औषध प्रशासन विभागाचे उपायुक्त अशोक राठोड, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके यावेळी उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले, माझे कुटुंब… मोहिमेत 25 टक्के कोविड रुग्णांत वाढ होऊ शकते. त्यासाठी साडेसहा हजार बेड तयार ठेवले आहेत. 25 ऑक्‍टोबर रोजी विजयादशमीला कोविड रावणाचा अंत यातून होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तालुक्‍यात नगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांनी हॉल उपलब्ध करून दिल्यास त्या तालुक्‍यातील खासगी डॉक्‍टर एकत्र येऊन तेथे कोविड सेंटर सुरू करू शकतील, असे ते म्हणाले. मात्र, खासगी डॉक्‍टर काम बंद करू शकत नाहीत. त्यांच्याविरुद्ध अत्यावश्‍यक सेवा कायदा

मी जनतेचा हमाल : पालकमंत्री
के. के. रेंज भूसंपादन होणार असल्याचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनीच आपल्याला सांगितले असल्याचे सांगत मुश्रीफ म्हणाले, के. के. रेंजबाबत जिल्ह्याची जी भूमिका आहे, तीच माझी असेल. पुढील आठवड्यात याबाबत बैठक घेणार आहे. मी जनतेचा हमाल आहे. जनतेचे जे मत असेल, तेच माझे मत असेल, असे ही पालकमंत्री यांनी म्हटले.

मी बोलवतो पण तेच येत नाहीत
जिल्ह्याच्या विकासाठी राजकीय गट-तट विसरून सर्वांनी पुढे यायला पाहिजे. आमदार राधाकृष्ण विखे यांना मी मिटिंगला बोलावतो. पण ते येत नाहीत. बहुदा ते सिनियर अन्‌ मी ज्युनियर असल्याने ते येत नसावेत. मला त्यांच्या सल्ल्याची नेहमी गरज असते, असा टोला मुश्रीफ यांनी विखेंना लगावला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.